ZP Election: आता शाई पुसून दाखवाच! जिल्हा परिषदसाठी निवडणूक आयोगाचा नवा प्लॅन तयार, घेतला मोठा निर्णय
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
ZP Eleciton: महापालिका निवडणुकीत मतदानाच्या वेळी मतदारांच्या बोटावर लावलेली मार्करची शाई सहज पुसली जात असल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून करण्यात आला.
मुंबई : महापालिका निवडणुकीत मतदानाच्या वेळी मतदारांच्या बोटावर लावलेली मार्करची शाई सहज पुसली जात असल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून करण्यात आला. या आरोपाच्या अनुषंगाने काही व्हिडीओदेखील व्हायरल झाले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण देत मतदारांचा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला. महापालिकांच्या निवडणुकीतील हा गोंधळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत होऊ नये यासाठी राज्य निवडणूक आयोग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.
नेमका वाद काय होता?
नुकत्याच झालेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकीत मतदारांच्या बोटावर लावण्यासाठी 'कोरस' कंपनीचे मार्कर पेन वापरण्यात आले होते. मात्र, ही शाई लावल्यानंतर काही वेळातच पुसली जात असल्याच्या तक्रारी राज्यभरातून समोर आल्या. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
मार्कर पेन का सुरू झाले होते?
advertisement
२०१२ पर्यंत निवडणुकांसाठी म्हैसूर पेंट्सच्या शाईच्या बाटल्यांचा वापर व्हायचा. मात्र, शाईच्या बाटल्या हाताळणे जिकिरीचे असते आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कोरस कंपनीचे 'इंडेलिबल इंक' मार्कर वापरण्यास सुरुवात केली होती. पल्स पोलिओ मोहिमेतही हेच मार्कर वापरले जातात, असा दावा करत आयोगाने या बदलाचे समर्थन केले होते.
advertisement
आता पुन्हा 'म्हैसूर' पॅटर्न
केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा आणि विधानसभेसाठी वर्षानुवर्षे कर्नाटकातील 'म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लि.' कंपनीची शाई वापरते. ही शाई अत्यंत खात्रीशीर मानली जाते. आता राज्य निवडणूक आयोगानेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी याच शाईकडे वळण्याचे संकेत दिले असून, त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी एका वृत्तपत्राला दिली आहे.
advertisement
निवडणुकीदरम्यान मतदारांच्या बोटावर लावली जाणारी निळी शाई देशात प्रामुख्याने कर्नाटकातील म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड आणि हैद्राबाद येथील रायुडू लॅबोरेटरी येथे तयार केली जाते. लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अनेक वर्षांपासून म्हैसूर कंपनीचीच शाई वापरली जात आहे. राज्य निवडणूक आयोगानेही दीर्घकाळ हीच शाई वापरली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 8:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ZP Election: आता शाई पुसून दाखवाच! जिल्हा परिषदसाठी निवडणूक आयोगाचा नवा प्लॅन तयार, घेतला मोठा निर्णय








