राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र देण्यात आलं आहे. या पत्रावर विविध महिला जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष तसेच महिला सचिव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पत्रात नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महिलांच्या सन्मान आणि न्यायासाठी कटिबद्ध असलेला पक्ष असून, त्या मूल्यांवर विश्वास ठेवून नाशिक जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्या निष्ठेनं काम करत आहेत. मात्र, अलीकडील घटनांमुळे पक्षाच्या तत्त्वांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
advertisement
अशोक खरात याच्याशी संबंधित छळ प्रकरणात महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा थेट संबंध असल्याचे उघड झाल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पक्षाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसंच यापूर्वीच्या काही वादग्रस्त प्रकरणांमध्येही त्यांच्या निष्काळजीपणामुळे पक्षाची बदनामी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पक्षाची प्रतिमा मलीन
अशा नेतृत्वाखाली तळागाळातील महिला कार्यकर्त्यांना काम करणे कठीण होत असून, ग्रामीण भागात जनतेसमोर पक्षाची भूमिका मांडताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी आणि मूल्यांचे रक्षण करण्यासाठी रूपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदासह सर्व पदांवरून तात्काळ काढून टाकावे अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या मागणीवर तातडीने कारवाई करून पक्षाचे होणारे नुकसान टाळावं, अशी अपेक्षा पत्राद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.
