यंदा बैलपोळ्यावर महागाईचं सावट असलं तरी समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. पैठण तालुक्यातील पाचोड, खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव, वेरूळ, तर सिल्लोड तालुक्यातील अंधारी, तसेच फुलंब्रीतील आळंद येथे भरलेल्या आठवडी बाजारांत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पोळ्यासाठी लागणारं सजावटीचं साहित्य खरेदी केलं. आपल्या सर्जा-राजाला काहीही कमी पडून देणार नाही, या भावनेनं शेतकरी बैलपोळ्याची खरेदी करत आहेत.
advertisement
Bialpola Festival: शिंगं रंगणार, घुंगरं वाजणार...बैलपोळा सणासाठी फुलली बाजारपेठ
केसरी, कवडी माळ, गोंडे, नाथ, वेसण, हिंगूळ, झुला इत्यादी साहित्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. तरीही शेतकरी खरेदी करीत आहेत. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साज, घुंगरू, बाशिंग, पितळी तोडे, मातीचे बैल अशा प्रत्येक साहित्याच्या किमतीत 15 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी 900 रुपयांना मिळणारी झुल यंदा 1200 रुपयांना, घुंगूरमाळा 1000 रुपयांवर पोहोचल्या आहेत. पितळी तोडे 950 ते 1100 रुपये किलो तर घुंगरू हार 150 रुपयांपर्यंत गेले आहेत.
मातीचे बैल झाले दुर्मिळ
गल्लेबोरगाव येथे मातीच्या बैलांची किंमत 20 रुपयांवरून थेट 50 रुपयांवर गेली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे परंपरागत मातीचे बैल बाजारातून गायब होऊन त्यांची जागा रंगीबेरंगी कृत्रिम बैलांनी घेतली आहे. गल्लेबोरगाव येथील साहित्य विक्रेता अशोक चंद्रटिके म्हणाले, मातीचे बैल आता दुर्मीळ झाले आहेत. त्यांची जागा प्लास्टिक आणि फायबरच्या रंगीबेरंगी बैलांनी घेतली. तरीही आमच्यासाठी पोळा म्हणजे परंपरा, संस्कृती आणि सर्जा-राजावरचा प्रेमभाव दाखवणारा सण आहे.
