घटना कशी घडली?
दावरवाडी (ता. पैठण) येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत काम पाहणारे गणेश आनंद पहिलवान हे अन्य शाखेतून 25 लाख रुपयांची रोकड स्कुटीवरून घेऊन येत होते. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पाचोड-पैठण मार्गावर दोन अज्ञात व्यक्तींनी काळ्या मोटारसायकलवर येऊन त्यांना अडवले. तोंड बांधलेले हे दोघे कर्मचाऱ्याला धमकावत जवळील पैसे भरलेली गोणी हिसकावून पसार झाले. तातडीने पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
advertisement
घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी स्थानिक गुन्हा शाखेला तपासाची विशेष जबाबदारी दिली. निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तातडीने घटनास्थळाचा आणि संबंधित बँक शाखांचा बारकाईने तपास सुरू केला.तपासादरम्यान पोलिसांचे लक्ष भारत राजेंद्र रूपेकर (रा. नानेगाव) या व्यक्तीकडे गेले. त्याचे घर दावरवाडी शाखेपासून जवळ असतानाही तो दूरच्या पैठण शाखेत अचानक व्यवहारासाठी आला होता. मागील दोन वर्षांत तो कधीच तिथे आला नव्हता. त्याचबरोबर त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीही समोर आली आणि संशय अधिकच दृढ झाला.
स्थानिक गुन्हा शाखेने मिळालेल्या माहितीवरून पैठण शहर परिसरात सापळा रचला. पळून जाण्याच्या तयारीत असलेले भारत रूपेकर, विष्णू बोधने, सचिन सोलाट आणि विशाल चांदणे हे चौघे एमएच-२० एफयू-3379 या स्वीफ्ट कारमध्ये अडवण्यात आले.
त्यांच्याकडून लुटलेले 25 लाख रुपये, 6 लाखांची कार व 8 मोबाईल फोन असा एकूण 31,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपींनी आर्थिक अडचणीमुळे गुन्हा केल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निरीक्षक विजयसिंग राजपूत, उपनिरीक्षक संतोष मिसळे, पवन इंगळे, पोह. विठ्ठल डोके, विष्णू गायकवाड, शिवानंद बनगे, अनिल चव्हाण, अशोक वाघ, राहूल गायकवाड, अनिल काळे, सनि. खरात, योगेश तरमाळे, जिवन घोलप यांनी या गुन्यात उल्लेखनीय भूमिका बजावली. पुढील तपास पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन पंडीत हे करत आहेत.