पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सुरक्षित ठेवण्यासाठी प्राणिमित्र आणि वनकर्मचारी सातत्याने काम करत आहेत. परिसरात शांतता राखणे, नागरिकांची गर्दी थांबवणे, आवाज कमी ठेवणे अशा उपाययोजना राबवून पिल्लांच्या आसपास सुरक्षित वातावरण निर्माण केले जात आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आणि पिल्लांपासून दूर राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
जवळच काही दिवसांपूर्वी रानात पाचट जळून गेल्यानंतर परिसर उघडा झाला आहे. तरीही नाइट-व्हिजन कॅमेऱ्यांत मादी बिबट्या सदैव पिल्लांच्या आसपास फिरताना दिसते. पण मानवी गंधामुळे ती जवळ असूनही पिल्लांना सोबत घेऊन जात नाही. त्यामुळे ही लहान पिल्ले भुकेमुळे आणि इतर वन्य प्राण्यांच्या संभाव्य हल्ल्यामुळे धोक्यात आहेत.
advertisement
ऊसतोडीच्या वेळी कामगारांना मादी बिबट्या आणि तीन पिल्ले दिसल्याने अचानक आरडाओरड झाली. त्यातून मादी दोन पिल्लांना घेऊन दूर गेली, पण एक पिल्लू मागे पडले. उत्सुकतेमुळे अनेकांनी त्याला हात लावला. दरम्यान, जवळच सापडलेल्या दुसऱ्या पिल्लालाही काही ग्रामस्थांनी स्पर्श केल्याचे समजले. त्यामुळे दोन ठिकाणची पिल्ले मानवाच्या संपर्कात आल्याची बाब वनविभागाला कळताच पथकाने तातडीने त्यांचे निरीक्षण सुरू केले.
वनविभागाने गेल्या दहा दिवसांपासून विशेष कॅमेरे, पावलांचे ठसे, पिंजरे आणि रात्रीच्या हालचालींच्या आधारे मादीचा शोध घेत तिला पिल्लांच्या जवळ आणण्याचे कसून प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
