अरमानला 10 दिवसांपूर्वी कुत्रा चावला होता. डोक्यात जखम होती. त्यानंतर त्रास होऊ लागल्याने विविध खासगी रुग्णालयांमध्ये नेण्यात आले. त्याची प्रकृती अधिक खालावत असताना सोमवारी रात्री घाटीत दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. अरमानचा मृत्यू रेबीजनेच झाला, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. घाटी रुग्णालयाने नमूद केले की, चिमुकल्याला 'व्हायरल मेनिंगा इन्फलायटिस'चे निदान झाले होते. यात मेंदूच्या भागाला संसर्ग झाला होता. बुधवारी महापालिकेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शाहेद शेख यांनीही घाटी रुग्णालयाकडून अरमानवर उपचार करण्यात आलेली सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली. त्याचा मृत्यू रेबीजने झाला नाही, असे त्यांनी सांगितले.
advertisement
बुधवारी महापालिकेने अरमान राहात होता त्या जुना मोंढा भागातील भटके कुत्रे पकडणे सुरू केले. दिवसभरात पाच ते सहा कुत्रे पथकाच्या हाती लागले. अरमानचे सर्व नातेवाईक, शेजारी अशा 19 जणांना मनपाच्या आरोग्य विभागाकडून रेबीजची लसही देण्यात आली. यंदा श्वानदंशाच्या घटनेत घट दिसून येत असल्याचा दावा महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आला.
घाटीत बुधवारी दिवसभरात मोकाट कुत्रा चावलेल्या 61 जणांवर उपचार करण्यात आले. यात बालरोग विभागाच्या वॉर्ड क्रमांक-24 मध्ये 12 वर्षाखालील 9 मुलांवर उपचार करण्यात आले. तर वॉर्ड क्रमांक-10 मध्ये दिवसभरात 52 जणांवर उपचार करण्यात आले. कुत्रा चावल्यानंतर रेबीस लस दिली जाते. ही लस घेतल्यानंतर रुग्णाला दोन तास रुग्णालयात दाखल ठेवले जाते.
2020 पासून कुत्रे चावल्यांची संख्या
2020 पासून कुत्र्यांच्या चाव्यामुळे रुग्णांची संख्या बदलत आहे. 2020-21 मध्ये ४५७९ रुग्ण नोंदले गेले, 2021-22 मध्ये 3286, 2022-23 मध्ये 3811, 2023-24 मध्ये 4529, 2024-25 मध्ये 4054 रुग्ण झाले. चालू वर्षी 2025 मध्ये आतापर्यंत 1662 रुग्ण नोंदले गेले आहेत.