मिळालेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय घटस्फोटित महिला नोकरीच्या शोधात शहरात आली होती. वृत्तपत्रातील जाहिरातीवरून एफ व्होल्ट, शंकरा रेसीडन्सी, उल्कानगरी रोड, निअर ऑगस्ट होम, श्रीनगर, गारखेडा या कंपनीत नोकरी मिळाली. कंपनीचा मालक अविनाश रामभाऊ उढाण याच्याशी ओळख वाढल्यानंतर त्याने थायलंडमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून उच्च वेतनाची नोकरी असल्याचं सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यासाठी दीड लाख रुपये घेतल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तिला दिल्ली विमानतळावरून थायलंडला पाठवण्यात आलं.
advertisement
बँकॉक विमानतळावर पोहोचल्यावर हरपीत सिंग नावाच्या व्यक्तीने तिला रिसिव्ह करून कंबोडियातील क्रिएटिव्ह माईंडसेट या कंपनीत नेऊन सोडलं. तेथे महिलेच्या हातून फसवणुकीच्या चॅटिंग स्कॅमचे काम करून घेतले जात असल्याचे तिला लक्षात आले. अविनाश उढाण याने स्वतःच तिची विक्री केल्याचा धक्कादायक खुलासा या दरम्यान झाला. दोन महिन्यांनी तीने 2 हजार यूएस डॉलर्स देऊन तेथून सुटका केली आणि भारतीय दूतावासाच्या मदतीने 21 ऑक्टोबर रोजी भारतात परतली.
मुंबई विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली असता, तिला या कामाच्या स्वरूपाबद्दल काहीही माहिती देण्यात आली नव्हती, असे उघड झाले. त्यानंतर सहार पोलिस ठाण्यात अविनाश उढाण याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परदेशातील नोकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणूक रॅकेट्सबद्दल गंभीर चिंता व्यक्त होत आहे.
