''आमच्या मेहनतीला योग्य मोबदला द्या,'' ''शेतकऱ्यांवर अन्याय बंद करा,''अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. वाढता वाहतूक खर्च, दरात मोठी घसरण आणि माल खराब होण्याचा धोका यामुळे शेतकरी महामार्गावरून हटण्यास तयार नव्हते.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कन्नड पोलिस ठाण्याचे पोनि. सानप आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी मध्यस्थीला पुढे सरसावले. दर ठरविण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी शनिवारी संचालक मंडळाची बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी अखेर आंदोलन मागे घेतले.
advertisement
पानपोई फाटा उपबाजार समितीत गुरुवारी टोमॅटोला 15 ते 20 रुपये किलो दर मिळाल्याने शुक्रवारी अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात माल घेऊन आले होते. मात्र, व्यापाऱ्यांनी अचानक भाव पाडून तो 10 ते 12 रुपये किलोवर आणला. त्यातच प्रत्येकी कॅरेटमागे दहा रुपयांची कपात केल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला. व्यापाऱ्यांनीही माघार घेण्यास नकार दिल्याने शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी ट्रॅक्टरसकट महामार्गावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
