ही हृदय पिळवटून टाकणारी घटना छत्रपती संभाजीनगरातील वेदांतनगर भागात मंगळवारी घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांच्या आयुष्यात एकाच दिवशी आई आणि पत्नी दोघींचं निधन झाल्याने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे.
रुक्मिणी रूपचंद परदेशी (वय 96) या शंभरीच्या उंबरठ्यावर होत्या. काही दिवसांपूर्वी त्या नाशिकला आपल्या मुलाकडे गेल्या होत्या. मंगळवारी दुपारी त्यांचे निधन झाल्याची बातमी परदेशी कुटुंबाला मिळताच घरात शोककळा पसरली. हे दुःख सुन विजया परदेशी (वय 62) सहन करू शकल्या नाहीत. आईसमान सासू गेल्याच्या धक्क्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांनीही अखेरचा श्वास घेतला.
advertisement
रुक्मिणीबाई यांच्यावर नाशिक येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पाच मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. तर विजया परदेशी यांच्यावर बुधवारी दुपारी ३ वाजता पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुली, एक मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे.
