वाळूज परिसरातील 36 वर्षीय गायत्री यांनी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळाविरोधात वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या अन्य सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गायत्री यांचा विवाह 43 वर्षीय दीपक हरिचंद्रे रा एल-175, म्हाडा कॉलनी, तिसगांव, छत्रपती संभाजीनगर यांच्यासोबत झाला असून त्यांना दोन मुली आहेत. लग्नाच्या सुरुवातीचे काही महिने व्यवस्थित गेल्यानंतर सासरच्यांकडून त्रास सुरू झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पती दीपक हा व्यवसायासाठी माहेरहून 3 लाख रुपये घेऊन ये, अशी वारंवार मागणी करत शिवीगाळ आणि अपमान करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
घरकामावरून टोमणे, ‘तू आमच्या लायकीची नाही’ असे अपमानास्पद बोल तसेच मानसिक आणि शारीरिक छळ सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एवढ्यावरच न थांबता, नणंद संगिता केरे आणि तिचे पती बाळासाहेब केरे यांनी पतीला दुसरे लग्न करण्यासाठी चिथावणी दिली आणि “हिला घराबाहेर काढ, मी तुझ्यासाठी दुसरी मुलगी बघते” असे सांगितल्याचाही आरोप आहे.
सगळ्यात धक्कादायक म्हणजे, “तुला आणि तुझ्या मुलींना संपवून टाकू” अशी गंभीर स्वरूपाची धमकी नणंदीकडून देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या सर्व प्रकरणाच्या आधारे वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पती, सासू-सासरे, नणंद आणि इतर नातेवाईकांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.
