35 वर्षीय व्यापारी इलेक्ट्रिकल कामाचे गुत्तेदार असून त्यांची सातारा परिसरात कंपनी आहे. बँकेचे व्यवहार ते एसबीआयच्या योनो अॅपद्वारे करतात. 18 ऑक्टोबर रोजी त्यांनी पासवर्ड रीसेट केला होता. त्यानंतर त्यांच्या खात्यात कंपनीचे 1 लाख 99 हजार रुपये जमा असल्याचे दिसले. काही वेळातच अज्ञात क्रमांकावरून मिस कॉल आला. त्या कॉलवर परत फोन करण्याचा प्रयत्न करताच त्यांच्या मोबाइलवर सतत ओटीपी मेसेज येऊ लागले.
advertisement
हे सर्व मेसेज एसबीआयच्या नावाने आले होते. त्या गोंधळात एक लिंकही आली. व्यापाऱ्याने ती लिंक उघडताच त्यांच्या मोबाइलमध्ये अनोळखी अॅप इंस्टॉल झाले आणि काही सेकंदांतच खात्यातील 1.97 लाख रुपये गायब झाले.
‘एसएमएस बॉम्बर’ म्हणजे काय?
सायबर गुन्हेगार एकाचवेळी शेकडो ओटीपीसारखे मेसेज पाठवतात. त्यामुळे व्यक्ती गोंधळून जाते आणि त्या दरम्यान आलेली फसवणुकीची लिंक क्लिक करते. त्यातून गुन्हेगार मोबाइलवर नियंत्रण मिळवतात आणि खाते रिकामे करतात.
अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल?
1)बँकेच्या नावाने आलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका.
2)बँक व्यवहार नेहमी अधिकृत अॅप किंवा वेबसाइटवरूनच करा.
3)सार्वजनिक वाय-फायवरून व्यवहार टाळा.
4)अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आल्यास परत कॉल करू नका.
5)संशयास्पद मेसेज आले की लगेच बँकेशी संपर्क साधा.
