छत्रपती संभाजीनगरातील रेंगटीपुरा भागात राहणारे शेख शाहरूख शेख सलीम वय 30 हे व्यापारी आहेत. 27 ऑक्टोबर रोजी ते घराकडे जात असताना शेख रियाज शेख अनिस 25, रा. कटकट गेट या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने त्यांना अडवून “मैंने मर्डर किया है… पैसे नहीं दिया तो तुझे भी खत्म कर दूंगा” असे म्हणत 10 हजारांची मागणी केली. शाहरूख यांनी तक्रार नोंदवली नाही म्हणून त्याचा वेग अधिकच वाढला.
advertisement
पुढील काही दिवस आरोपीने व्यापाऱ्याच्या हालचालींवर पाळत ठेवून सतत मेसेजद्वारे धमक्या दिल्या. खंडणीची रक्कम 10 हजारांवरून थेट 50 हजारांपर्यंत नेली. दरम्यान, “तू कुठेही गेला तरी तुझ्यासाठी शूटर तयार ठेवला आहे” अशा संदेशांनी त्याने भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.शाहरूख यांनी सततच्या त्रासाला कंटाळून जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, ही तक्रार दिल्याचे समजताच रियाजने पोलिसांनाच फोन करून “वो बाहर मिलेगा, मैं देख लूंगा” अशी भाषा केली. व्यापाऱ्याला पुन्हा पुन्हा हत्येच्या धमक्या पाठवत राहिला.
जिन्सी पोलिसांनी या गंभीर प्रकरणावर तातडीने कारवाई करत शुक्रवारी रियाजविरोधात खंडणी व धमकीचे गुन्हे दाखल केले. हा आरोपी काही दिवसांपूर्वीच हत्येच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, जामिनावर असतानाही तो पुन्हा धमक्या देत फिरत असल्याने त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
