हे विस्तारीकरण चिकलठाणा, मुर्तीजापूर आणि मुकुंदवाडी परिसरातील सुमारे 56.25 हेक्टर क्षेत्रात होणार आहे. याआधी नोव्हेंबर 2023 मध्ये शासनाने जमीनसंपादनासह सुमारे 578 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली होती. निधी उपलब्ध झाल्याने जानेवारी 2026 पासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सध्या विमानतळाची धावपट्टी 9,300 फूट लांबीची असून ती अपुरी ठरत होती. विस्तारीकरणानंतर धावपट्टीची लांबी वाढणार असून मोठ्या तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांची ये-जा शक्य होणार आहे. यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना थेट विमानसेवेचा लाभ मिळणार असून वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे.
advertisement
विमानतळ विस्तारामुळे उद्योग व पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. टोयोटा, जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटीसह अनेक मोठ्या उद्योगांच्या पूरक कंपन्या येथे येण्याची शक्यता असून शहराची देश-विदेशाशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. परिणामी गुंतवणूक, रोजगार आणि पर्यटन वाढून मराठवाड्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने बळ मिळणार आहे.
विमानतळ विस्तारामुळे छत्रपती संभाजीनगर औद्योगिक नकाशावर अधिक ठळकपणे येणार आहे. देशातील व परदेशातील सुमारे 80 हून अधिक मोठ्या कंपन्यांचा कच्चा माल थेट येथे पोहोचू शकेल. त्याचबरोबर ड्रायफ्रूटसह विविध मालाची निर्यात सुलभ होणार असल्याने स्थानिक उद्योगांना मोठा फायदा होईल. ही संधी शहरासाठी मैलाचा दगड ठरणार असून, आता मराठवाडा उद्योगांच्या बाबतीत खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर जाईल अशी प्रतिक्रिया मसिआचे माजी अध्यक्ष चेतन राऊत यांनी दिली.
