मैत्रीच्या सहलीवर काळाचा घाला
नागसेननगर (उस्मानपुरा) येथील रहिवासी असलेला हर्षदीप, 13 मित्रांसोबत रविवारची सुट्टी साजरी करण्यासाठी म्हैसमाळ आणि वेरुळ येथे फिरायला गेला होता. म्हैसमाळ फिरून झाल्यानंतर, दुपारी हे सर्व मित्र वेरुळ लेणी धबधब्याच्या वर डोंगरावर असलेल्या येळगंगा नदीवरील जोगेश्वरी कुंडावर गेले. या ठिकाणी मोठे आणि खोल डोह आहेत. हर्षदीपचा चुलत भाऊ पाण्यात उतरला आणि तो बुडू लागला. त्याला बुडताना पाहून हर्षदीपने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. त्याने आपल्या भावाला वाचवले, मात्र हर्षदीपला स्वतःला पोहता येत नसल्यामुळे तो बुडू लागला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी आरडाओरडा करत खूप प्रयत्न केले, पण हर्षदीप पाण्यात बुडाला.
advertisement
शहरावर शोककळा, कुटुंब आणि मित्रांना धक्का
हर्षदीपचे वडील महानगरपालिकेत कंत्राटदार म्हणून काम करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. हर्षदीप देवगिरी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत होता आणि वडिलांना त्यांच्या कामात मदत करत असे. त्याचे सर्वांशी चांगले संबंध असल्याने त्याचे मित्र त्याच्यासोबत फिरायला जात असत. हर्षदीपच्या या अकाली निधनाने नागसेननगर परिसरात तसेच त्याच्या मित्र आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
जोगेश्वरी कुंड - पर्यटकांनो सावधान!
वेरुळ लेणी क्रमांक 29 च्या जवळ एक धोकादायक धबधबा आहे. या धबधब्याच्या वर डोंगरात जोगेश्वरी गुहा आणि कुंड आहे. गणेश मंदिराच्या आणि म्हैसमाळच्या परिसरातून उगम पावणारी येळगंगा नदी या ठिकाणी वेगाने वाहते. पावसाळ्यात या ठिकाणी हौशी पर्यटक, ट्रेकर्स आणि यूट्यूबर्सची मोठी गर्दी असते. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने पर्यटकांना या धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखण्यासाठी गुहेकडील रस्ता बंद केला आहे. तरीही, पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी खुलताबाद-म्हैसमाळ रस्त्याने या कुंडावर जातात.
हे ही वाचा : स्पायडरमॅनचं भूतं चढलं डोक्यावर, ऑटोमागे तरुणाचा जीवघेणा स्टंट, नवी मुंबईतील VIDEO
हे ही वाचा : Weather Alert: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल, आज पाऊस की उघडीप, मंगळवारचा हवामान अंदाज