सिल्लोड तालुक्यातील आमठाणा गावात धार्मिक पूजेच्या वेळी लागलेल्या आगीत भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुर्गा कैलास दिवटे (वय ३३) यांचे नाव या मृत महिलेचे असून, त्यांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. दिवटे यांच्या घरी मागील आठवड्यात धार्मिक विधी सुरू होते. घरातील वातावरण मंगलमय होते. पूजा करताना दिव्याजवळील साडीचा पदर चुकून ज्योतीला स्पर्श झाला आणि क्षणभरात साडीने पेट घेतला. आगीत त्या गंभीर भाजल्या.
advertisement
नातेवाइकांनी तातडीने त्यांना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
आठ दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या दुर्गा दिवटे यांनी अखेर बुधवारी सायंकाळी प्राण सोडले. या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हवालदार अनंत जोशी करत आहेत.अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे आमठाणा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
