संक्रांत येण्याआधीच जीवघेण्या घटना वाढल्या
महादेव मंदिर रोडवरून दुचाकीने घराकडे जात असताना व्यापारी विशाल विजय बोथरा यांच्या गळ्यात अचानक नायलॉन मांजाचा फास अडकला आणि क्षणभरात गळ्याला खोल जखम झाली. रक्तस्त्राव वाढल्याने त्यांना तातडीने नाशिक येथे हलविण्यात आले असून त्यांच्या गळ्याला तब्बल 13 टाके पडले आहेत. डॉक्टरांनी त्यांना पुढील पाच महिने बोलण्यासही मनाई केली आहे. ही घटना किती घातक ठरू शकते याचे हे जिवंत उदाहरण आहे.
advertisement
बंदी असलेला नायलॉन मांजा खुलेआम विकला जातोय, वापरला जातोय आणि प्रशासन मात्र कारवाईच्या नावाखाली फक्त कागदोपत्री हालचाली करीत आहे, अशी टीका नागरिकांकडून जोरात होत आहे. दरवर्षी संक्रांत जवळ आली की दुचाकीस्वारांचे गळे चिरणे, चेहऱ्यावर खोल जखमा होणे किंवा पादचाऱ्यांना जखमी करणाऱ्या घटना घडतात, पण यंदा तर अजून सणाची चाहूलही लागायची आहे आणि जीवघेणा मांजा रस्त्यावर दिसू लागला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातही अशा घटना नियमितपणे घडत असून उड्डाणपूल, मुख्य चौक, गजबजलेल्या रस्त्यांवर मांजाचे तुटके तुकडे हवेत उडताना वारंवार दिसून येतात. अनेक दुचाकीस्वार थरारक प्रसंगातून बचावले आहेत, तर काहींना टाके घालण्याची वेळ आली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर वैजापूरची घटना नागरिकांसाठी इशारा ठरली आहे. बंदी असूनही नायलॉन मांजाची विक्री कोण करत आहे? साठा कुठे तयार होतो? आणि पोलिस आणि प्रशासनाच्या नजरेआड इतक्या मोठ्या प्रमाणात हा घातक मांजा बाजारात कसा पोहोचतो? हे प्रश्न आणखी गडद होत चालले आहेत. आगामी काळात संक्रांत जवळ आली तर या घटनांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने तातडीने कठोर कारवाईची मागणी होत आहे.
नायलॉन मांजामुळे होणाऱ्या जखमा केवळ क्षणिक नसतात तर त्या व्यक्तीच्या जीवनावर दीर्घ परिणाम करणाऱ्या असतात. व्यापारी विशाल बोथरा यांच्या बाबतीत घडलेला प्रसंग याचीच जाणीव करून देणारा आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि वैजापूर परिसरात नायलॉन मांजाची बेकायदेशीर विक्री रोखणे आणि रस्त्यांवरील धोकादायक मांजाचे तुकडे त्वरित हटविणे ही प्रशासनाची तातडीची जबाबदारी असल्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
