पहाटे अपघाताचा कॉल आला आणि सगळ उध्वस्त झालं
मंगळवारी दुपारी सिहोर येथे दर्शन झाल्यानंतर लता राजू परदेशी (47), आशा राजू चव्हाण (40 )दोघी रा. वाळूज दोघींनी मुलांना कॉल करून दर्शन चांगले झाल्याचे कळवले. रात्री 9 वाजता रेल्वे एका थांब्यावर असताना आशा यांनी मोठा मुलगा पवनला कॉल करून त्याला वडील, लहान भावासह जेवणाविषयी विचारपूस केली. पवनने आईला 'शहरात पोहोचल्यावर कॉल कर, मी तुला घ्यायला येतो', असे सांगितले होते. पहाटे उठून घ्यायला जाण्याच्या तयारीत तो होता. मात्र 5 वाजता आईच्या अपघाताचा कॉल आला. थरथरणाऱ्या अंगाने पवन घाटीत दाखल झाला. तेव्हा आठ तासांपूर्वी आनंदाने बोललेल्या आईचा मृतदेह पाहण्याची वेळ त्याच्यावर आली. त्याच्या आक्रोशाने घाटीतील उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले होते.
advertisement
वाळूज आणि नगर नाक्यावर प्रवाशांना उतरविल्यानंतरही चालक चेन्नवरी श्रीकांत गुवे (29, रा. बिदर, कर्नाटक) आणि क्लिनर राज सुनील बैरागी (20, रा. मध्यप्रदेश) यांनी डिक्कीचा दरवाजा उघडा असल्याचे पाहिले कसे नाही, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. तो बऱ्याच अंतरापासून तसाच उघडा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. मात्र, पहाटेची वेळ असल्याने तो दरवाजा अन्य वाहनाला धडकला नाही. पंचवटी सारख्या छोट्या रस्त्यावरही चालक सुसाट वेगात जाताना तो रिक्षाला लागून अपघात झाला.
आशा यांचे पती चालक आहेत. त्यांचा लहान मुलगा दहावीत असून मोठा मुलगा पवन महाविद्यालयीन शिक्षण घेतो. तर परदेशी यांच्या पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांची मोठी मुलगी विवाहित असून 29 वर्षांच्या मुलाचे वाळूजमध्ये वेल्डिंग वर्कशॉप आहे. चार वर्षांच्या अंतराने आई-वडील दोघांच्या प्रेमाला तो पारखा झाला. घाटीत दोघींच्या मुलांच्या आक्रोशाने सर्वच हळहळले.
