अपघात नेमका कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना दुपारी 12 वाजेच्या सुमारास नाशिक-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर 'जरूळ फाट्या'जवळ घडली. झालं असं की, एक पिकअप गाडी भरधाव जात असताना अचानक त्या गाडीचं टायर निखळलं अन गाडी पलटी झाली. या अपघातात गाडीतले दहा जण जखमी झालेत, त्यांना तातडीने दवाखान्यात हलवण्यात आलंय.
तर दुसरी घटना ही (दि.13) रात्री दोनच्या सुमारास शहरातल्या येवला रोडवर दुसरा भीषण अपघात मंगळवारी झाला. यात जालना जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले आणि सध्या लाख खंडाळा भागात राहणारे प्रदीप बाजीराव गोतीस (वय 40) हे आपल्या दुचाकीवरून जात असताना गाडीवरचा ताबा सुटला अन त्यांची गाडी थेट दुभाजकाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरात होती की प्रदीप गोतीस यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
खंबाळा येथून कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे अद्रक काढणीसाठी मजुरांना घेऊन जाणारी पिकअप गाडी (एमएच 06 एजी 4493) 25 हून अधिक मजुरांना घेऊन निघाली होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास गाडी 'जरूळ फाट्या'जवळ आली असताना अचानक धावत्या वाहनाचं मागचं टायर फुटलं आणि थेट गाडीपासून वेगळं होऊन बाहेर फेकलं गेलं. वेग जास्त असल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि प्रवाशांनी भरलेली ही पिकअप रस्त्यावरच पलटी झाली.
जखमींवर उपचार सुरू
या अपघातात पिकअपमधील प्रियांका पवार (वय 18 वर्षे), काजल मोरे (16), मोनाली मोरे (28), सुवर्णाबाई मोरे (30), यशवंत मोरे (80), काशीनाथ धीवर (27), इंदर पवार (18), बाळू मोरे (45), वसीम शेख (34) आणि ज्योती मोरे (32) हे जखमी झाले. सर्व जण वैजापूर तालुक्यातील खंबाळा येथील रहिवासी आहेत. जखमींना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
