शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर हे दोघे मित्र रांजणगाव नरहरी शिवारातील एका खदानित पोहण्यासाठी गेले होते. सुमारे दुपारी एक ते दोनच्या दरम्यान ते घटनास्थळी पोहोचले. मात्र, काही वेळानंतर ते परतले नाहीत. खदानीच्या काठावर त्यांचे कपडे, पुस्तकांची बॅग आणि चपला पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने स्थानिकांना संशय आला. त्यांनी तत्काळ याबाबत पोलिसांना आणि अग्निशामक दलाला कळवले.
advertisement
सायंकाळी पाचच्या सुमारास गंगापूर अग्निशामक दलाचे प्रभारी लक्ष्मण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या 15 मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर पथकाने दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. मृतदेह शिल्लेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईदरम्यान अविनाश गलांडे, अमोल मलिक आणि मधुकर वालतुरे यांनी महत्त्वाचे सहकार्य केले.
घटनास्थळी शिल्लेगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोजने, बीट अमलदार विनोद बिघोत, तलाठी गणेश लोणे आणि पोलीस पाटील कडू म्हस्के उपस्थित होते. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात दोन्ही मुलांचा मृत्यू अपघाती बुडाल्याने झाल्याचे समोर आले आहे.
या घटनेमुळे थोरवाघलगाव, भगूर आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही विद्यार्थी अभ्यासात हुशार आणि उत्साही स्वभावाचे असल्याने त्यांच्या मृत्यूने मित्रपरिवार, शिक्षक आणि पालक शोकमग्न झाले आहेत.
स्थानिक ग्रामस्थांनी या घटनेनंतर प्रशासनाकडे तातडीने खदान परिसरात सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या खदानीभोवती कोणतीही सुरक्षा भिंत किंवा चेतावणी फलक नसल्याने अशा दुर्घटना घडण्याची शक्यता वाढते असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गंगापूर तालुका शोकाकुल झाला असून, दोन निरागस जीवांनी गमावलेले आयुष्य सगळ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणणारे ठरले आहे.