बजाज नगर–वडगाव (कोल्हाटी) रस्त्यावर, एका खासगी शाळेसमोरच भररस्त्यात पूजा केलेले मडके, बाहुली, रांगोळी, अगरबत्ती, लिंबू, मीठ आणि कुंकू ठेवलेले आढळले. त्यावर धमकीवजा मजकूर लिहिलेला असल्याने काही वेळ परिसरात ये- जा थांबली. तो धमकीवजा मजकूर मडक्यावर "मौत है" असा लिहिलेला होता. शाळेसमोरच हा प्रकार झाल्याने विद्यार्थी, पालक आणि स्थानिक रहिवासी अस्वस्थ झाले. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या उपस्थितीत विज्ञाननिष्ठ नागरिकांच्या मदतीने रस्त्यावर ठेवलेली सामग्री हटवण्यात आली.
advertisement
घटनेबाबत खासगी शाळेचे व्यवस्थापक नामदेव बनकर यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार कोणाला तरी दहशत बसवण्यासाठी किंवा मुद्दाम भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी केल्याचा संशय व्यक्त होत असून पोलीस तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संबंधित व्यक्तीचा शोध घेतला जाणार आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा अंधश्रद्धांना बळी न पडता, असे प्रकार दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
