एआयच्या विशेष तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज, बोलण्याची ढब, भाषणाची शैली, आणि त्यांचे धगधगते विचार पुन्हा एकदा शिवसैनिकांना अनुभवण्याची संधी मिळणार आहे. या भाषणाचे संवाद शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी लिहिले आहेत.
बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात कोणत्या मुद्द्यांवर भाष्य
नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे निर्धार शिबिर होत असून या शिबिरासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या शिबिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे या शिबिरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात हुबेहूब भाषण होणार आहे. शिवसेनेवर ओढावलेली परिस्थिती, भाजपची हिंदुत्वावरील मक्तेदारी, शिवसेना पक्षफूट, राज्यातले सध्याचे राजकारण, अशा मुद्द्यांवर बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषण शिवसैनिकांना ऐकायला मिळणार आहे.
advertisement
बाळसाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणांचे ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्स, विचारसरणी यांचा अभ्यास करून तांत्रिक टीमने हे भाषण तयार केले आहे. त्यामुळे या मेळाव्यात जणू बाळासाहेब ठाकरेच भाषण करतायेत की काय अशी अनुभूती प्रेक्षकांना येईल. शिवसेनेच्या मूळ विचारधारेशी जनतेला पुन्हा आकृष्ट करणे तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गट, बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा असल्याचा संदेश देण्यासाठी ही कल्पक संकल्पना राबवत असल्याचे दिसून येते.
राजकीय प्रचारात एआयचा पहिलाच प्रभावी वापर
राजकीय प्रचारात एआयचा असा प्रभावी आणि भावनिक वापर महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच घडत आहे. या प्रकारामुळे नाशिकमधील मेळावा अधिक लक्षवेधी ठरणार असल्याचे शिवसेना नेते सांगत आहेत.
शिवसेनेचा टीजर लॉन्च, बाळासाहेब घेणार भाजपचा समाचार
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो... जय महाराष्ट्र आज तुफान गर्दी दिसतेय... नाशिक म्हटल्यावर शिवसेनेचं खास नातं... आणि ते राहणारच... कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे ढोंग... महाराष्ट्रात काय देशात कुणी ओळखत नव्हते, सगळा पैशांचा खेळ, आज हिंदुत्वाचे खरे मारेकरी कुणी असतील तर हेच भाजपवाले... हिंदुत्व ही तुमची खासगी मालमत्ता नाही. हिंदू हिंदूंमध्ये भांडणं लावली जातायेत, जाती पोटजातीमध्ये मारामाऱ्या लावून मजा बघतायेत. पण एक गोष्टठासून सांगतो, तुमचे १०० बाप खाली उतरले तरी शिवसेनेचे अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही...!