महाविकास आघाडीत पेच; आज महत्त्वाची बैठक
एकीकडे शरद पवार गटाने सुनेत्रा पवारांना पाठिंबा दर्शवत निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली केल्या होत्या, तर दुसरीकडे काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याशी चर्चा करणार आहेत. या चर्चेत महाविकास आघाडीची एकजूट टिकणार की काँग्रेस स्वतंत्र वाट चोखाळणार, याचा फैसला होणार आहे. उद्धव ठाकरे गट या वादात कोणाची पाठराखण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
राज्यात दोन पोटनिवडणुका, काँग्रेस हायकमांडनं काय सांगितलं?
काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांची 'वंचित बहुजन आघाडी' आणि महादेव जानकर यांचा 'राष्ट्रीय समाज पक्ष' (रासप) यांनाही आपल्यासोबत घेतले आहे. या नवीन समीकरणाने काँग्रेस बारामती आणि राहुरीच्या रिंगणात उतरणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेस-रासपचा उमेदवार असू शकतो. तर, राहुरीत काँग्रेस मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र काँग्रेसला दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी देखील निवडणुका लढवण्यासाठी हिरवा सिग्नल दिला आहे.
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच...
खासदार सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी असून त्यांना विधीमंडळाचे सदस्य व्हावे लागणार आहे. त्यासाठी बारामती विधानसभा पोटनिवडणूक जिंकावी लागणार आहे. काँग्रेसला मिळालेली प्रकाश आंबेडकर आणि महादेव जानकर यांची साथ बारामतीतील दलित आणि धनगर समाजाच्या मतांवर मोठा प्रभाव टाकू शकते. त्यामुळे ही निवडणूक आता केवळ औपचारिक न राहता 'काँटे की टक्कर' होण्याची चिन्हे आहेत.
राहुरीतही 'अपक्ष' आणि 'काँग्रेस'चा सस्पेन्स
राहुरीमध्ये भाजपने दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना मैदानात उतरवले आहे. या ठिकाणी शरद पवार गट प्राजक्त तनपुरे यांना 'अपक्ष' म्हणून ताकद देण्याच्या तयारीत आहे. त्यातच आता काँग्रेसनेही या जागेवर दावा ठोकल्याने राहुरीची लढतही बहुकोणीय होण्याची शक्यता आहे.
