याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक रुग्णालयात 30 ते 40 राखीव बेड ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे सिव्हील हॉस्पिटलमध्ये जखमी गोविंदांसाठी 20 बेड असलेला विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षात सर्व आवश्यक सुविधा, औषधं आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथकं सज्ज ठेवण्यात आली आहेत.
advertisement
ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार म्हणाले, "दहीहंडी हा केवळ शक्ती, कौशल्य आणि मैत्रीचा सण नाही, तर काळजी, जिव्हाळा आणि सुरक्षिततेची भावना जपण्याचं प्रतीक आहे. या उत्सवात प्रत्येक गोविंदाची सुरक्षा फार महत्त्वाची आहे. त्यामुळे दहीहंडीचे मनोरे लावताना कोणी गोविंदा जखमी झालाच तर त्याच्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विशेष कक्षात सोय करण्यात आली आहे."
डॉक्टरांना विशेष सुचना
दरवर्षी मुंबई महानगरपालिकेकडून पालिका हॉस्पिटल्समध्ये जखमी गोविंदासाठी विशेष व्यवस्था केली जाते. यावर्षी 16 उपनगरीय हॉस्पिटल्समध्ये 105 बेडची व्यवस्था केली गेली आहे. प्रमुख हॉस्पिटल्समध्ये प्रत्येकी 30 ते 40 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. गोविंदावर तात्काळ उपचार करावेत, दिरंगाई करू नये, अशा सुचना डॉक्टरांना देण्यात आल्या आहेत. शिवाय, वरिष्ठ डॉक्टर आणि अपघात विभागामध्येही ऑन ड्युटी निवासी डॉक्टरांना जखमी गोविंदावर तत्काळ उपचार करून संबंधित विभागांना कळवण्याबाबत परिपत्रक काढलं आहे.
पालिका प्रमुख रुग्णालयाच्या संचालिका डॉ. नीलिमा आंद्रडे म्हणाल्या, "आपत्कालीन परिस्थितीत आम्ही जखमी गोविंदावर उपचार करणार आहोत. राखीव बेड ठेवण्यात आलेले असून ऑनड्युटी निवासी डॉक्टरासह वरिष्ठ डॉक्टरही रुग्णालयात हजर असतील."