सतीश उर्फ खोक्या भोसले याला बीड न्यायालयाने मारहाण प्रकरणातून निर्दोष मुक्त केले आहे. काही महिन्यांपूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसले याने एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. काल बीड न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केल्यानंतर तो आज कारागृहातून बाहेर आला आहे. यावेळचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
advertisement
खोक्या भोसले कोण आहे?
हत्या, हत्येचा प्रयत्न, मारहाण, प्राणघातक हल्ला, जबरदस्तीने संपत्ती मिळणं, धमकी देणं, फसवणूक, खोटी कागदपत्र बनवणं, खोटे पुरावे सादर करणं.... असे अनेक काळे कारनाम्यांनी बदनाम असेलेला नामचीन गुंड म्हणजे खोक्या भोसले. खोक्या भोसले हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. साधारण वर्षभरापूर्वी त्याने एका व्यक्तीच्या तळपायावर बॅटने अमानुषपणे मारहाण केली. त्याने केलेल्या अमानुष मारहाणीचा काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पोसलेला या गुंडाचे क्रौर्य महाराष्ट्राच्या समोर आले.
खोक्याचा मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे अनेक व्हिडीओ समोर आले. महागड्या गाड्यांमध्ये बसून पैशांची बंडलं उडवण्याचा त्याचा व्हिडीओ महाराष्ट्रात अनेकांनी पाहिला. या व्हिडीओत त्याचा माज स्पष्ट दिसतो. त्याला पोलिसांचा कसलाही धाक नाही हे विशेष.
