मिळालेली माहिती अशी की, वाघोरा गावचे ग्रामरोजगार सेवक शुभम माने यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये माने हे चक्क ग्रामपंचायत कार्यालयात आपल्या खुर्चीवर बसून एका व्यक्तीकडून काही पैसे स्वीकारताना स्पष्ट दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कशा प्रकारे आर्थिक पिळवणुकीला सामोरे जावे लागते, याचे विदारक चित्र चव्हाट्यावर आले आहे.
advertisement
सेवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी
याप्रकरणी कोंडीबा लोंढे या पीडित शेतकऱ्याने माजलगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे (BDO) लेखी तक्रार दाखल केली आहे. लोंढे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या फळबाग लागवडीचे मस्टर काढण्यासाठी ग्रामरोजगार सेवकाने पैशांची मागणी केली होती. हतबल होऊन पैसे देताना त्यांनी हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. आता या व्हिडिओ पुराव्यासह त्यांनी संबंधित सेवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निलंबनाची कारवाई करणार का?
ग्रामीण भागात 'मनरेगा' सारख्या योजनांमधून मजुरी आणि अनुदान मिळवण्यासाठी ग्रामरोजगार सेवकाची भूमिका महत्त्वाची असते. मात्र, याच पदाचा गैरवापर करून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. आता या व्हायरल व्हिडिओची दखल घेऊन पंचायत समिती प्रशासन शुभम माने यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
