बीड - अनेकांना व्यवसाय करताना अडचणी येतात. त्यामुळे काही जण खचून जातात. तर काही जण खचता प्रयत्न करत राहतात आणि आपला व्यवसाय यशस्वी करुन दाखवतात. आज अशाच एका ऊसतोड कामगार ते एक व्यावसायिक असा प्रवास केलेल्या व्यक्तिची प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
कडाजी कांबळे असे या व्यावसायिकाचे नाव आहे. ते मागील 4 ते 5 वर्षांपासून चामड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवतात. तसेच या वस्तूंची विक्री करून या व्यवसायाच्या माध्यमातून ते चांगली कमाई करत आहेत. ते या सर्व वस्तू हातानेच बनवतात.
advertisement
हा व्यवसाय करण्याआधी कडाजी कांबळे हे ऊसतोड कामगार म्हणून काम करत होते. काम करत असताना उचल म्हणून मिळवलेल्या पैशाची गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी चामड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी जे लागणारे साहित्य विकत घेतले आणि व्यवसायाला सुरुवात केली. ते चामड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवतात. यामध्ये बैलाचे पट्टे, कोल्हापुरी चप्पल, साधी चप्पल, बूट, कंबर पट्टा त्याचबरोबर चाबूक, वादी या वस्तूंचा समावेश आहे.
हा व्यवसाय सुरू केल्यावर त्यांना सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण त्यांनी या सर्व गोष्टींना तोंड दिले. हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद वाढू लागला आणि त्यांच्या या व्यवसायामध्ये वाढ होऊ लागली. आज त्यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले आहे. आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून ते वर्षाला 4 ते 5 लाख रुपयांचा नफा मिळवतात, अशी माहिती त्यांनी दिली.