काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी असाच एक दुर्दैवी अपघात झाला होता, जेव्हा एक कार खाडीत कोसळली होती. सुदैवाने त्या घटनेत कारमधील महिला सुखरूप बचावली होती, मात्र आजची घटना अधिक गंभीर आहे. रात्रीच्या अंधारात बचाव कार्यातही अनेक अडथळे आले. या दोन तरुणांसोबत नेमकं काय घडलं जाणून घेऊया.
रात्रीच्या अंधारात धोकादायक ठरलेला रस्ता
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात जेट्टीवरून उरणच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर घडला. या रस्त्यावर वाहनचालकांचा अंदाज अनेकदा चुकत असल्याचे दिसून आले आहे. डावीकडील सर्व्हिस रोड जिथे संपतो, तिथे रस्ता अचानक खाडीकाठाशी संपतो. विशेषत: रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश नसल्यामुळे हा धोका अनेक पटीने वाढतो आणि या ठिकाणी अपघात नित्याचे झाले आहेत.
अपघातानंतर तातडीने बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू केले. एका तरुणाला पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, बेपत्ता असलेल्या दुसऱ्या तरुणाचा खाडीच्या खोल पाण्यात शोध घेणे बचाव पथकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा या धोकादायक ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत, जेणेकरून भविष्यात असे हृदयद्रावक अपघात टळू शकतील.