यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बागलकोट जिल्ह्यातील तालिकोट येथून एक महिला आपल्या मुलीसोबत शनिवारी (२१ जून २०२५) सायंकाळी अडवी सिद्धेश्वर मठात आली होती आणि रात्री ती तिथेच थांबली. रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास काही स्थानिकांनी सिद्धराम, महिला आणि तिची अल्पवयीन मुलगी एकाच खोलीत असल्याचे पाहिले.
ही बाब समजताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने मठात जमा झाले. संतप्त जमावाने मठात घुसून स्वामी अडवी सिद्धराम स्वामी यांना धारेवर धरले आणि त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना मारहाण करण्यात आली. याच वेळी काही तरुणांनी महिलेसोबत असभ्य वर्तन केले, तर तिच्या अल्पवयीन मुलीचे कपडे फाडून तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच मुडलगी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनी महिला आणि तिच्या मुलीला सुरक्षितपणे तेथून बाहेर काढून समुपदेशन केंद्रात पाठवले. त्यानंतर, गावकऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून रात्रीच स्वामी अडवी सिद्धराम यांना मठातून बाहेर काढले. सध्या स्वामी बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथे असल्याचे समजते.
या घटनेला काही दिवसांपूर्वीच रायबाग तालुक्यात घडलेल्या एका अशाच घटनेची किनार आहे. रायबाग तालुक्यातील मेकळी गावात राम मंदिराचा मठ उभारून राहणाऱ्या हठयोगी लोकेश्वर स्वामीजी यांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप होता. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केली होती. ही मुलगी आपल्या मामाच्या घरी जात असताना, स्वामीने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले आणि रायचूर येथील एका लॉजमध्ये दोन दिवस ठेवून अत्याचार केले होते. त्यानंतर बागलकोटला आणूनही तिच्यावर अत्याचार करून, प्रसंगी धमकावून महालिंगपूर बसस्थानकात सोडून दिले होते. या घटनेनेही संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
अशा या घटनेमुळे धार्मिक संस्थांच्या पावित्र्यावर आणि तेथील कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अलीकडच्या काळात धार्मिक नेत्यांवर होणारे असे आरोप समाजासाठी चिंतेचा विषय बनले आहेत.