मोहन जाधव, प्रतिनिधी, रायगड: महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये आलबेल नसल्याचे चित्र असून अंतर्गत वाद उफाळून आला आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये पक्ष फोडाफोडीवरून वाद पेटला आहे. तर, दुसरीकडे शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये मागील काही महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष आता तीव्र झाला आहे. राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांना निर्वाणीचा इशारा दिला. एक दिवस तुमचा जय महाराष्ट्र करणार असल्याचा इशारा गोगावले यांनी दिला.
advertisement
कोकणातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. स्थानिक संस्था निवडणुकीच्या सभेतून राजकीय वार-पलटवार जोरात होऊ लागले आहेत. मंत्रीपदाच्या जबाबदाऱ्यांमुळे काही बंधने असली तरी एक ना एक दिवस त्यांचा ‘जय महाराष्ट्र’ करणारच,” अशा शब्दांत राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला. एका सार्वजनिक सभेत त्यांनी केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आलं आहे. शिवसेना शिंदे गटाच्या रोहा येथील सभेत बोलताना गोगावले यांनी हे वक्तव्य केलं.
प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा...
भरत गोगावले म्हणाले की, “प्रत्येक गोष्टीला लिमिट असते. भरत शेठवर कोणताही चुकीचा आरोप असेल तर त्याची शिक्षा तो भोगेल. पण आमच्यावर, आमच्या कार्यकर्त्यांवर किंवा आमच्या तिघांवर कोणी चुकीचा आरोप केला असेल, तर त्यांनीही देवासमोर फुल उचलायचं आणि त्याचे प्रायश्चित्त भोगायचं, असं गोगावले यांनी म्हटलं. धावीर महाराज आणि वीरेश्वर महाराज या ठिकाणचे फुलं उचलून शपथ घेऊन सांगावं की आम्ही चुकीचं वागलं असं आव्हान गोगावले यांनी दिलं. गोगावले यांनी पुढं म्हटलं की, “जोपर्यंत चुकत नाही, तोपर्यंत भरत शेठ कधी झुकत नाही.
यापुढे त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर तीव्र टीका करत म्हटले, “तुमची महाराष्ट्रात काय हैसियत होती? तुमची एकमेव जागा आम्ही जिंकून दिली. अन्यथा संपूर्ण राज्यात तुमचा सुपडा साफ झाला होता. महेंद्र शेठ, रवी शेठ आणि मी, आम्ही तिघांनी जरा वाकडी मान केली असती तर तुमचा टांगा पलटी झाला असता असंही गोगावले यांनी म्हटलं.
गोगावले यांच्या या वक्तव्यामुळे कोकणातील तटकरे–गोगावले संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
