भिगवण येथून मंगळवारी दुपारी तीन वाजता मुलीचे अपहरण झाल्याचे सांगण्यात आले. मुलगी खरेदीहून येत असताना आरोपीने मुलीच्या घरच्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून मुलीचे अपहरण केल्याचा आरोप आहे. मात्र कथित अपहरणाच्या २४ तासांनंतर माझे अपहरण झालेले नसून आमचे प्रेमप्रकरण असल्याचे मुलीने व्हिडीओद्वारे सांगितले आहे. हे अपहरण प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय ठरल्यानंतर पडळकर भिगवणला आले. तिथे हजारोंचा जमाव जमला होता. पडळकर यांच्या नेतृत्वात हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजनही केले गेले होते.
advertisement
गोपीचंद पडळकरांना वेगळाच संशय
मुलीवर कोणीतरी दबरदस्ती करून व्हिडीओ तयार करीत असल्याचे गोपीचंद पडळकर यांना वाटते. त्यांनी मुलीच्या कुटुंबियांची बाजू घेऊन आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच आरोपी मुलाच्या काकांची भिगवण परिसरात प्रचंड दहशत असल्याचे सांगत त्यांच्या अनेक गुन्ह्यांत कारवाई झाली नसल्याचा आरोप केला.
मुलीचा दबरदस्तीने व्हिडीओ तयार करून तो पोलीस अधिकारी आणि नातेवाईकांना पाठवला जातोय. मी आत्ता मुलीचे भाऊ, मामा, चुलते यांच्याशी चर्चा केली. तिला वडील नाही. तिचे लग्न पुढच्या चार दिवसांत होणार होते. अशा परिस्थितीत जबरदस्तीने या मुलीचे अपहरण केले आहे. आज मी भिगवणला आलोय. आज भिगवणमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा काढणार आहोत. हिंदू समाज संतापलेला आहे.
मुलाला वाचविण्याचा कुणीतरी प्रयत्न करतंय. अपहरण करूनही मुलीकडून जबरदस्तीने व्हिडीओ करून घेत आहेत, याचा अर्थ मुलाची हिम्मत वाढली आहे. नक्कीच त्याच्यामागे कुणाचा तरी हात आहे. त्याचे चुलते इथले गुंड आहेत, त्यांची प्रचंड दहशत आहे. त्यांच्या नावावर अनेक गुन्हे आहेत, असे पडळकर म्हणाले.
होय माझे त्याच्याशी प्रेमसंबंध, मुलीचा कबुलीनामा
माझे आणि मुलाचे गेल्या काही वर्षापासून प्रेमसंबंध आहे. माझे अपहरण झाल्याच्या बातम्या आहेत. परंतु माझे कुणीही अपहरण केले नाही. माझ्या डोळ्यात चटणी वगैरे टाकलेली नाही. मी माझ्या मर्जीने घरातून निघून आले आहे. राजकीय पुढाऱ्यांनी तसे आरोप केले. परंतु मी माझ्या मर्जीनेच मुलासोबत आलेली आहे, असे भिगवण प्रकरणातील मुलीने स्पष्ट केले.
