नेमकं प्रकरण काय होतं?
मंगळवारी (१७ मे) दुपारी चारच्या सुमारास भिगवण परिसरात ही घटना घडली होती. २१ वर्षीय तरुणी आपल्या आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत होती. त्यावेळी दोन सख्ख्या भावांनी आई आणि भावाला मारहाण केली, त्यांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकली आणि तरुणीला जबरदस्तीने टेम्पोमध्ये टाकून नेले, अशी फिर्याद तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिली होती. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
अपहरण की पलायन? महाबळेश्वर ते बारामती असा प्रवास
मिळालेल्या माहितीनुसार, कथित अपहरणानंतर ही तरुणी आणि तिचा मित्र श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे आणि सासवड असा प्रवास करत थेट महाबळेश्वरला पोहोचले. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य आणि पोलिसांचा वाढता ससेमिरा लक्षात घेता, मध्यरात्री दीड वाजता हे दोघेही स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. तिथे तरुणीने दिलेल्या जबाबाने पोलिसांनाही चकित केले. तिने कुटुंबीयांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे.
> तरुणीने पोलिसांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटले?
मी वरील ठिकाणची कायमची रहिवाशी असून माझे वडील मयत झाले असून सोबत आई वय वर्षे:- ४०, भाऊ, वय वर्षे:- १८ व भाऊ वय १६ वर्ष असे आम्ही एकत्रित राहत असून आम्ही शेती करून आमच्या कुटुंबाची उपजिवीका भागवतो. मी भिगवण येथे टी.वाय.बी.ए चे शिक्षण घेत असून माझे आमच्या शेजारी राहणारे तरुण याच्याबरोबर मागील १ वर्षापासून प्रेम संबंध होते याची कल्पना माझ्या कुटुंबातील माझी आई व २ भावंडांना होती. मी प्रियकरासोबत लग्न करणार आहे, असे त्यांना वारंवार सांगितलेले होते. परंतु त्यांचा आमच्या प्रेमविवाहाला विरोध होता. म्हणून त्यांनी माझे इच्छे विरोधात आमच्या नात्यातील मुलासोबत दि. २२/०२/२०२६ रोजी लग्न करण्याची तारीख व वेळ निश्चित केली होती. या लग्नाला माझा पुर्णपणे विरोध होता मी वारंवार माझी आई व दोन्ही भावंडांना मला तुम्ही ठरविलेल्या मुलासोबत लग्न करणे मान्य नसून मी प्रियकरा सोबतच लग्न करणार आहे त्याचे आणि माझे १ वर्षापासून प्रेम संबंध आहेत तरीही त्यांनी माझे बोलण्याकडे दुर्लक्ष करून माझे इच्छे विरोधात जबरदस्तीने रावणगाव येथील इसमाबरोबर लग्न लावून देण्याचे ठरविले होते. हे मला मान्य नसल्याने दि. १७/०२/२०२६ रोजी मी माझा भाऊ याचा मोबाईल नंबर ८XXXXXXXXX या मोबाईल नंबर वरून प्रियकराला फोन करून आज दुपारी मला भिगवण येथील बाजारपेठेमध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी आई आणि भाऊ हे घेऊन जाणार आहेत तरी तू भिगवण येथील रेस्ट हाऊसच्या जवळ आनंद हॉटेलच्या पाठीमागे येवून थांब व मी आई आणि भाऊ यांची नजर चुकवून तुझ्या सोबत निघून येणार आहे. असा फोन प्रियकराला केला होता. आमचे झालेल्या सदर भाषणाप्रमाणे दि. १७/०२/२०२६ रोजी मी माझी आई व भाऊ प्रियकरासोबत फोनवर बोलणे झालेल्या संभाषणाप्रमाणे भिगवण येथील रेस्ट हाऊसच्या जवळील आनंद हॉटेलच्या पाठीमागे दि. १७/०२/२०२६ रोजी दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी आलो असता त्याठिकाणी अशोक लेलंड या कंपनीचा दोस्त मॉडेल ही टेम्पो गाडी याचा ही गाडी घेऊन प्रियकर थांबलेला होता. त्यावेळेस मी माझी आई व भाऊ यांची नजर चुकवून सदर टेम्पोमध्ये पळत जाऊन बसले व प्रियकराबरोबर नगरच्या दिशेने गेले जात असताना त्वरीत मी माझा भाऊ याचा मोबाईल नं. ८XXXXXXXX या नंबरवर प्रियकराचा मोबाईल नं. ९XXXXXXXX या नंबरवरून दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी मी त्याच्या बरोबर निघून जात आहे माझे त्याच्याबरोबर १ वर्षापासून प्रेम संबंध आहेत याची कल्पना या आगोदर ही मी तुम्हाला दिलेली होती. असे मोबाईल फोनवरून फोन करून सांगितलेले होते.
आम्ही नगर दिशेने जाऊन नगरच्या बाहेरील बायपासने पुन्हा पुणे रोडने येऊन हडपसरला पोहोचून हडपसरवरून सासवड मार्गे वाठार, जि. सातारा याठिकाणी बस स्टॉपला थांबलो व दुसऱ्या दिवशी सकाळी दौंडच्या दिशेने येण्यासाठी निघालो असता सोशल मीडियावरून मला कळाले की, माझी आईने प्रियकर व त्याचा भाऊ यांचेविरोधात मला प्रियकर व त्याच्या भावाने जबरदस्तीने माझ्या आईवर त्याच्या हातातील लाकडी दांडके उगारून प्रियकराच्या भावाने माझी आई व भाऊ यांच्या डोळ्यात मिरचीची पुढ टाकून माझे अपहरण केले आहे तसेच माझ्या आईने खरेदी केलेली नथ व चांदीची अंगठी प्रियकर आणि त्याच्या भावाने हिसकावून नेली आहे अशी खोटी व बनावट फिर्याद दिलेली आहे.
सदरची फिर्याद ही माझ्या आईने कोणाच्यातरी सांगण्यावरून व कोणाच्यातरी दबावावरून खोटी व बनावट स्वरूपाची दिलेली असून आईच्या फिर्यादीमधील मजकुराप्रमाणे कोणत्याही प्रकारची घटना घडलेली नसून मी स्वतः माझ्या राजीखुषीने व मर्जिने प्रियकरा बरोबर १ वर्षापासून असलेल्या प्रेमसंबंधामुळे आमचा एकमेकांवर विश्वास असल्याने प्रियकरा सोबत आई व भाऊ यांची नजर चुकवून भिगवण येथील रेस्ट हाऊसच्या जवळ आनंद हॉटेलच्या पाठीमागून निघून गेली होती या पुढील आयुष्य मी त्याच्या सोबतच राहणार आहे. त्याबाबत इतर कोणालाही दोषी ठरविण्यात येवू नये. मी पुर्णपणे सज्ञान असल्याने मला माझ्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार आहेत.
वरील नमूद विषयांप्रमाणे प्रस्तुतचे प्रतिज्ञापत्र केले असून त्यातील सर्व मजकूर माझे माहीती व समजूतीप्रमाणे खरा व बरोबर असून ती टायपिंग झालेनंतर वाचून पाहून बरोबर असल्याची खात्री करून घेवून खालील साक्षीदारांसमवेत सही व अंगठे केलेले आहेत. सदरहू माहिती खोटी निघाल्यास मी (बी.एन.एस) कलम २३६, २३७ व २२९(२) नुसार शिक्षेस पात्र राहीन, याची मला जाणीव आहे.
