नरेश पाटील, प्रतिनिधी, भिवंडी-ठाणे: भिवंडी शहर आणि ग्रामीण मधील आगीचे सत्र थांबले नसल्याचे दिसून येत आहे. आजही शहरानजीकच्या राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील मुनीसुरत कंपाऊंड येथील महादेव मढवी कॉम्प्लेक्स मधील कपड्याच्या गोदामास पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची तीव्रता अधिक असून गोदाम जळून खाक झाले आहे.
advertisement
राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील मुनीसुरत कंपाऊंडमध्ये स्थित महादेव मढवी कॉम्प्लेक्समधील कपडा साठवणूक गोदामाला भीषण आग लागली. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या या गोदामात मोठ्या प्रमाणात कपडा साठवलेला होता. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की दुसऱ्या मजल्याच्या भिंती कोसळल्या.
आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किट असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असला तरी अधिकृत पुष्टी अद्याप नाही. पहाटेच धुराचे लोट दिसताच स्थानिकांनी अग्निशमन विभागाला कळवले. भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन तसेच ठाणे महापालिकेची एक अशा तीन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, पाण्याचा तुटवडा भासल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचे प्रयत्न अधिकच आव्हानात्मक झाले. मर्यादित साधनसामग्री आणि पाण्याअभावी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. मात्र कपड्यांचा मोठ्या प्रमाणावर साठा जळून खाक झाल्यामुळे आर्थिक नुकसान प्रचंड असल्याचे स्थानिकांनी सांगितले. ऐन दिवाळीच्या सणात लागलेल्या आगीमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यासह वीजेची जोडणीदेखील तपासून घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
बारामतीमध्ये ही रॉकेटमुळे लागली आग...
बारामती शहरातील फलटण रोड लगत असणाऱ्या भंगाराच्या गोडाऊनला काल रात्री अचानक आग लागली. या आगीने काही क्षणात उग्ररूप घेऊन शेजारी असणाऱ्या गोडाऊनला देखील भक्ष्य केले. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीला रात्री उशिरा बारा वाजण्याच्या आसपास नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले. फटाक्यांच्या रॉकेट मुळे ही आग लागल्याचा अंदाज दर्शविण्यात येत आहे. आगीमुळे मोठ्या प्रमाणात भंगार गोदामाचे नुकसान झाले आहे.