स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकीत नवी राजकीय समीकरणे दिसण्याची चिन्हे आहेत. नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्यासाठी काही दिवसांचा अवधी असताना दुसरीकडे बहुतांशी ठिकाणी जागा वाटपांच्या चर्चा सुरू आहेत. अशातच राज्यात युतीची पहिली घोषणा करण्यात आली आहे. भाजप ४१ जागांवर आणि राष्ट्रवादी ८ जागांवर निवडणूक लढवणार आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत महायुतीतील दोन घटक पक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शिवसेनेला डावलत थेट स्थानिक युती केली आहे. या युतीतील जागावाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, नगराध्यक्षपद भाजपच्या वाट्याला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला उपनगराध्यक्षपदासह आठ जागा आणि एक स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आले आहे.
advertisement
या नव्या समीकरणामुळे महायुतीतील तिसरा घटक असलेल्या शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे. राज्यात सत्तेत असूनही स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेले मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत.
१२ ऑक्टोबर रोजी भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशीष दामले यांच्या घरी पत्रकार परिषद घेऊन भाजप-राष्ट्रवादी युतीची घोषणा केली होती. राज्यातील ही पहिली स्थानिक पातळीवरील महायुतीतील अंतर्गत युती म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे. या घोषणेनंतर शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली होती. भाजपने शिवसेनेलाही युतीत सामील होण्याचं आमंत्रण दिलं असलं, तरी स्थानिक नेत्यांमध्ये समन्वय न जमल्याने ती शक्यता मावळली.
