मात्र आता या घडामोडीत आणखी एक ट्विस्ट आला आहे. मुंबईच्या महापौरपदानंतर आता भारतीय जनता पक्षाने उपमहापौर पदावरही आपला दावा ठोकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून झेप घेतली आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने २९ जागा जिंकल्या आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत भाजपला केवळ महापौर पदच नको, तर उपमहापौर आणि अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणारं 'स्थायी समिती' अध्यक्ष पदही आपल्याकडेच हवं आहे.
advertisement
भाजपनं ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये महापौर पद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडलं आहे. याच्याच बदल्यात मुंबई महापालिकेतील सगळी पदं आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. "जर आम्ही इतर ठिकाणी शिवसेनेला पदे सोडली आहेत, तर मुंबईत सर्वात मोठा पक्ष असल्याने आम्हाला तिन्ही महत्त्वाची पदे मिळायला हवीत," असा सूर भाजप गोटातून उमटत आहे.
आता याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीनंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेतील तिन्ही महत्त्वाच्या पदांवर भाजपनं दावा केल्यानंतर येत्या काळात भाजप विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
