नाशिक : महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी नाशिकचे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळाले. तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमुळे सर्वच पक्षांत काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली असली, तरी सर्वाधिक गोंधळ आणि नाराजी भारतीय जनता पक्षात (भाजप) पाहायला मिळाली. अनेक वर्षे पक्षासाठी निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते आणि अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर आला. त्यामुळे ही निवडणूक केवळ सत्तास्पर्धा न राहता, पक्षांतर्गत असंतोष, गटबाजी आणि राजकीय डावपेचांची कसोटी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
advertisement
भाजपने यंदा तब्बल ३३ ‘आयाराम’ नेत्यांना उमेदवारी देत त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. दुसरीकडे, अनेक जुने, अनुभवी आणि निष्ठावंत कार्यकर्ते तिकीटवाटपात डावलले गेल्याने पक्षात प्रचंड असंतोष उसळला. बाहेरून आलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिल्याने दिवसभर भाजप कार्यालय, निवडणूक अधिकारी कार्यालय आणि संबंधित परिसरात नाराजीचे नाट्य रंगले. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी थेट पक्ष नेतृत्वावर रोष व्यक्त केला, तर काहींनी शांत राहून ‘वेळीच उत्तर दिले जाईल’ असे संकेत दिले.
बडगुजर घराण्याचा वरचष्मा
ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले सुधाकर बडगुजर यांचे पक्षातील वजन वाढल्याचे स्पष्टपणे दिसून आले. विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या समर्थकांना डावलत बडगुजर कुटुंबाला एकाच घरात तीन उमेदवाऱ्या देण्यात आल्या. सुधाकर बडगुजर यांच्यासह त्यांचा मुलगा दीपक बडगुजर आणि पत्नी हर्ष बडगुजर यांना थेट उमेदवारी मिळाली आहे.
सीमा हिरे समर्थकांना धक्का
हर्ष बडगुजर यांच्या प्रभागात आमदार सीमा हिरे यांच्या समर्थक भाग्यश्री ढोमसे यांनाही सुरुवातीला एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, हर्ष बडगुजर यांचा उमेदवारी अर्ज आधी दाखल झाल्याने तो वैध ठरवण्यात आला. परिणामी भाग्यश्री ढोमसे यांची उमेदवारी बाद झाली. या घटनेमुळे बडगुजर गट आणि सीमा हिरे गटात तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे.
भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी
यंदाच्या निवडणुकीत भाजपने शाहू खैरे, अदिती पांडे, बबलू शेलार, हितेश वाघ, ऐश्वर्या लाड, गौरव गोवर्धने, सागर लामखेडे, गुरमीत बग्गा, नीलम पाटील, खंडू बोडके, चित्रा तांदळे, मनीष बागूल, उषा बेंडकुळे, दिनकर पाटील, अमोल पाटील, संगीता घोटेकर, मानसी शेवरे, बाळा निगळ, सविता काळे, सोनाली भोंदुरे, सचिन मराठे, प्रशांत दिवे, शोभा सातभाई, नीलम गडाख, शाम गोहाड, सुनीता कोठुळे, नयना घोलप, जयश्री गायकवाड, राजेंद्र महाले, सुधाकर बडगुजर, दीपक बडगुजर, हर्ष बडगुजर, योगिता हिरे आणि भूषण राणे यांना संधी दिली आहे. यापैकी अनेक उमेदवार अलीकडेच इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेले असल्याने जुन्या कार्यकर्त्यांचा रोष अधिक वाढला आहे.
