भाजपच्या केंद्रीय समितीकडून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी, केंद्रीय निरीक्षक भाजपचे नवनिर्वाचित आमदारांची भेट घेणार आहेत. या बैठकीत आमदारांची मते जाणून गटनेत्याची निवड करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर अजूनही भाजपने गटनेत्याची निवड न केल्याने धक्कातंत्राच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्याआधीच भाजपने सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख जाहीर केली.
advertisement
भाजप नेत्याच्या वक्तव्याने धक्कातंत्राची चर्चा...
विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतरही भाजपने गटनेत्याची निवड केली नाही. तर, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपआपल्या गटनेत्याची निवड केली. मात्र, भाजपने चांगलाच वेळ घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित आहे. त्यामुळे महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत.
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, "भाजपचा विधीमंडळ नेता निवडण्यासाठी बैठक होणार आहे. विधीमंडळ गटनेत्याची नावे घेऊन प्रतिनिधी येतात. त्यानंतर नवनिर्वाचित आमदार नावे निवडतील. या निवडीनंतर अधिकृत घोषणा होईल, असे त्यांनी सांगितले.
वक्तव्याची चर्चा का?
काही राजकीय विश्लेषकांनी विधीमंडळ गटनेत्याच्या नावाचा प्रस्ताव दिल्लीवरून येईल, या मुनगंटीवार यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळेच दिल्लीतील धक्कातंत्राची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांचे नाव 99 टक्के निश्चित आहे. पण, उरलेल्या एक टक्का शक्यतेचा काही अंदाज लागत नाही. राज्यातील भाजपच्या जवळपास सगळ्याच आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. पण, दिल्लीवरून भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने कोणाचे नाव निश्चित केले हे गुलदस्त्यात आहेत. त्यामुळेच भाजपच्या धक्कातंत्राची चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी पुन्हा संधी नाकारण्याचे ठोस कारणही नाही. मात्र, मागील काही वर्षात भाजपने वापरलेल्या धक्कातंत्रामुळे मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाल्या आहेत.
