७७ वा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये भाजपचे नेते आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. गिरीश महाजनांनी यावेळी भाषण केलं. पण, भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याने एका महिला पोलिसांनी महाजनांना जाब विचारला होता. या प्रकरणी गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिलगिरी व्यक्त केली.
"डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव अनवधानाने राहिलं असेल, असं काही नाही. पण, तसा कोणताही हेतू नव्हता. त्यावेळी मी घोषणा दिल्या. भारत माता की जय, वंदे मातरम् , छत्रपती शिवाजी महाराज की जय ते बरोबर होतं. पण, अनवधानाने झालं असेल पण नाव डावलणे असा कोणताही हेतू नव्हता. मुद्यामहून नावं डावलण्याचा हेतू नव्हता, हवी तर माझी भाषणं एकदा काढून पाहा, जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतोय' असं म्हणत महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली.
advertisement
नेमकं काय घडलं होतं?
ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाषण केलं. पण, त्यांच्या भाषणावर वन विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी माधवी जाधव यांनी आक्षेप घेतला. "गिरीश महाजनांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही. जो व्यक्ती संविधानाला कारणीभूत आहे. याला तुम्ही संपवायला निघाले. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे. मी माफी मागणार नाही. पालकमंत्र्यांनी ही चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी देणं घेणं नाही. मी वाळूच्या गाड्या उतरेन. माती काम करेन. पण मी बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड करायचं असेल तर करू शकता. बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही. मी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या तारखांना मानत नाही. पण लोकशाही मानते. मॅडम तुम्ही देखील संविधानामुळे आहात. पालकमंत्री देखील संविधानामुळे आहेत." असं म्हणत जाधव यांनी रोखठोक भूमिका मांडली होती. माधवी जाधव यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
