सायन-कोळीवाडा परिसरात काल भगवान मुरुगन यांच्या भक्तांचा जनसागर उसळला होता. 'थैपूसम' उत्सवानिमित्त आयोजित भव्य 'पाळकुडम कावडी अट्टम' रॅलीत हजारो भाविक सहभागी झाले होते. भाजप आमदार तमिळ सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीला आता राजकीय वळण मिळाले आहे. सेल्वन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तमिळ भाषिकांवरील टीकेला थेट प्रत्युत्तर दिले आहे.
advertisement
मुरुगन भक्तांसमोर चिथावणीखोर वक्तव्य...
भगवान मुरुगन यांच्या उत्सवानिमित्त सायन कोळीवाडा ते माटुंगा येथील ऐतिहासिक मुरुगन मंदिरापर्यंत ही भव्य रॅली काढण्यात आली. पारंपरिक वाद्ये, कावडी आणि हजारो तमिळ बांधवांच्या उपस्थितीने हा परिसर दुमदुमून गेला होता. सायनमधील तमिळ समुदायाची एकजूट दाखवण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
राज ठाकरेंना जशास तसे उत्तर
रॅलीदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार तमिळ सेल्वन कमालीचे आक्रमक पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी तमिळ भाषिकांच्या मुद्द्यावरून केलेल्या विधानाचा समाचार घेत सेल्वन म्हणाले की, "काही दिवसांपूर्वी एका मोठ्या नेत्याने तमिळ बांधवांच्या विरोधात विधान केले होते. आजची ही गर्दी आणि ही रॅली त्या वक्तव्याला उत्तर आहे. आम्हाला कोणीही विनाकारण वाईट बोलू नका, अन्यथा त्याचे परिणाम काय असतील हे आज दिसून आले आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, येत्या एका महिन्यात मुंबईत १ लाख तमिळ बांधवांची याहून मोठी रॅली काढून आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, असा इशारा सेल्वन यांनी दिला.
नव्या वादाची सुरुवात?
तमिळ सेल्वन यांनी थेट राज ठाकरेंचे नाव न घेता त्यांना दिलेले हे आव्हान मुंबईतील स्थानिक राजकारणात नव्या वादाला तोंड फोडण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान, भाजपचे तामिळनाडूमधील नेते अण्णामलाई यांनी मुंबई हे महाराष्ट्राचे नसल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मोठा संताप व्यक्त करण्यात आला होता. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत ताशेरे ओढत बोचरी टीका केली होती.
