दादर येथील 'वसंत स्मृती' येथे सकाळी 11 वाजता सुरू होणाऱ्या या बैठकीत मुंबईतील सर्व वॉर्डांचा सखोल आढावा घेण्यात येणार आहे. विशेषत: मराठी, हिंदी भाषिक तसेच गुजराती मतदारांशी संवाद वाढवून त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ठोस रणनिती आखण्यात येणार आहे. मतदारसंघनिहाय विश्लेषण, कार्यकर्त्यांची सक्रियता, प्रचार मोहीम, सोशल मीडिया व घराघरांत पोहोच या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
advertisement
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या बैठकीला मुंबईतील आमदार, प्रमुख नेते, विविध सेलचे प्रमुख तसेच स्थानिक पातळीवरील अनुभवी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. पक्षाने स्पष्ट केले आहे की, आगामी निवडणुकीत भाजपची ताकद प्रत्येक वॉर्डात ठळकपणे दिसून यावी यासाठी सर्व विभागीय संघटनांमध्ये समन्वय साधला जाणार आहे. या बैठकीत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार सर्व विभागातील सेल प्रमुखांशी संवाद साधत असताना प्रमुख अजेंडा या संदर्भात संवाद साधताना पाहायला मिळणार आहे.
भाजपने गेल्या काही वर्षांत मुंबईत केलेल्या विकासकामांची माहिती, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ, तसेच स्थानिक प्रश्नांवर दिलेल्या तोडग्यांचा प्रचार मोठ्या प्रमाणावर केला जाणार आहे. ठाकरे बंधूंच्या हालचालींना तोंड देण्यासाठी पक्षाने मतदारांशी थेट संवाद साधण्यावर आणि जनतेचा विश्वास दृढ करण्यावर भर देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
या बैठकीतून निवडणूकपूर्व रणनितीची पायाभरणी होईल अशी अपेक्षा असून, पक्षातील सर्व घटकांना एकत्र आणून संघटनात्मक ताकद वाढविण्याचा संकल्प भाजपने केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत निर्णायक यश मिळविण्यासाठी भाजप पूर्ण क्षमतेने मैदानात उतरणार आहे, असेही मुंबई भाजपच्या सूत्रांनी सांगितले.
