भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. सोलापूर जिल्ह्यात भाजपने आपल्या मित्रपक्षांनाच मोठा राजकीय धक्का दिला आहे. मोहोळ तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश शिरसागर आज अधिकृतपणे भाजपात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, नागनाथ क्षीरसागर हे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. आता तेच क्षीरसागर राजन पाटील यांच्या सोबत भाजपात प्रवेश करत असल्याने स्थानिक राजकारणात मोठा उलटफेर घडणार असल्याची चर्चा आहे.
advertisement
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतील प्रदेश भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. या प्रवेशामुळे मोहोळ तालुक्यात भाजपने शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही सहयोगी पक्षांच्या ताकदीवरच गदा आणली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि कार्यकर्त्यांच्या स्थलांतरामुळे सोलापूर जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. त्यांच्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारीही भाजपसोबत जाणार आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची मोठी ताकद वाढणार आहे.
