महायुतीमध्ये युतीबाबत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे. मात्र, राज्यातील अनेक ठिकाणी महायुतीमध्ये जागा वाटपांच्या मुद्यांवरून खटके उडवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता महायुतीवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतंत्रपणे स्पर्धेला सज्ज होण्याचे संकेत भाजपने दिले आहेत. महायुती झाली नाही, तर प्रत्येक नगरपालिका आणि नगरपंचायतीत आपला उमेदवार उभा करण्यासाठी भाजपने ‘प्लॅन बी’ अंतिम टप्प्यात आणला आहे.
advertisement
निवडणूक घोषणेआधीच भाजपने तयारीला वेग दिला. शनिवार, रविवार व सोमवारी प्रत्येक नगरपालिकेच्या शहरांत पक्षाचे आमदार, जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी यांना पाठविण्यात आले होते. या निरीक्षकांनी स्थानिक आमदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि शहरातील कार्यकारिणीकडून ‘वन-टू-वन’ चर्चा केली. यामधूनच थेट नगराध्यक्षपदासाठी तीन संभाव्य नावांची निवड केली. ही तिन्ही नावे लिफाफ्यात बंद करून थेट प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.
युती की स्वबळाचा निर्णय?
या चर्चांत फक्त नगराध्यक्षांचे नावच नव्हे, तर आगामी निवडणुकीतील संपूर्ण रणनीतीवर विचारमंथन झाले असल्याचे वृत्त आहे. निरीक्षकांनी स्थानिक कार्यकर्त्यांकडून नगरसेवकपदी कोणाला संधी द्यायची? युती केल्यास शिंदे गट आणि अजित पवार गटाला जागा कशा वाटायच्या? युती न झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी किती आहे? या मुद्यांवरही मत जाणून घेतले आहे.
नावांचेही होणार सर्वेक्षण...
प्रत्येक नगराध्यक्ष पदासाठीच्या प्रस्तावित असलेल्या तीन नावांचे सर्वेक्षण होणार आहे. दोन ते तीन दिवसांत हा सर्वेक्षण अहवाल पक्ष नेतृत्वापुढे जाईल. तीन नावांव्यतिरिक्त एखादी प्रभावी, परंतु पक्षात सक्रिय नसलेली व्यक्तीही योग्य उमेदवार ठरू शकते का, याचाही शोध घेतला जात आहे. समाजात प्रसिद्ध असणाऱ्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
