मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप–शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपावरचा तिढा अधिकच घट्ट होत चालला आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने जिंकलेल्या सर्व ८२ जागांवर पक्षाने ठाम दावा केला असून, शिवसेनेने मागणी केलेल्या ८४ जागा देण्यास भाजपने स्पष्ट नकार दिल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे.
शिंदे गटाची अट अमान्य...
गुरुवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत चर्चेची दुसरी फेरी पार पडली. पहिल्या बैठकीत भाजपने शिवसेनेला केवळ ५२ जागांची ऑफर दिली होती. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेनेने मागील निवडणुकीतील ८४ जिंकलेल्या जागांसह एकूण १२५ जागांची मागणी केली होती. मात्र, २०१७ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना आणि सध्याची एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांची संघटनात्मक ताकद समान नाही, असा युक्तिवाद करत भाजपने मागील निवडणुकीतील ८४ जागा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
advertisement
भाजपने आपली भूमिका अधिक कठोर करत, २०१७ मध्ये जिंकलेल्या ८२ जागांबरोबरच गेल्या आठ वर्षांत ज्या प्रभागांमध्ये पक्षाची ताकद वाढली आहे किंवा जिथे अन्य पक्षांतील माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहेत, त्या जागांवरही दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेनुसार, सध्या भाजपच्या १०२ आणि शिवसेनेच्या ५५ अशा एकूण १५७ जागांवर तात्पुरते एकमत झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
युतीच्या अपयशी जागा शिंदेकडे?
शिवसेनेला देऊ करण्यात आलेल्या जागांपैकी ५ ते १० जागा मुस्लीमबहुल किंवा काँग्रेस, समाजवादी पक्ष तसेच अपक्षांनी जिंकलेल्या प्रभागांतील आहेत. या जागांवर भाजप–शिवसेना युतीला आजवर यश मिळालेले नाही, अशी नोंदही सूत्रांनी केली. त्यामुळे अद्याप सुमारे ७० जागांवर मतभेद कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तिढा वरिष्ठ पातळीवर सोडवणार
या पार्श्वभूमीवर पुढील दोन ते तीन दिवसांत आणखी एक बैठक होणार असून त्यात काही प्रलंबित जागांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात थेट बैठक होऊन उर्वरित जागांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
