राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची लगबग वाढत असताना लोहा नगरपरिषदेतील एका निर्णयाने राजकीय वर्तुळात चर्चेचा धुरळा उडवला आहे. घराणेशाहीवर विरोधकांवर सतत टीका करणाऱ्या भाजपानेच या निवडणुकीत एकाच कुटुंबातील तब्बल सहा जणांना उमेदवारी देऊन स्वतःच्या भूमिकेवरच मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
नातेवाईकांचा गोतावळा निवडणुकीच्या रिंगणात...
लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाने गजानन सूर्यवंशी यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी जाहीर केली. मात्र उमेदवारींच्या यादीत पाहता सूर्यवंशी घराण्यातील उमेदवारांचा गोतावळा दिसून आला. नगरसेवकपदांसाठी त्यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी (प्रभाग ७ अ), भाऊ सचिन सूर्यवंशी (प्रभाग १ अ), भावाची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी (प्रभाग ८ अ), मेव्हुणा युवराज वाघमारे (प्रभाग ७ ब) आणि भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे (प्रभाग ३) या सर्वांची निवड पक्षाने केली आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांना तिकिटे मिळाल्याने भाजपातील अंतर्गत राजकारण, गटबाजी आणि स्थानिक पातळीवरच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
advertisement
लोहा नगरपरिषदेत १० प्रभागांमधील २० नगरसेवकांसाठी निवडणूक होत आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस, भाजप, अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले. त्यात भाजपाने सर्व २० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मात्र सहा उमेदवार एकाच कुटुंबातील असल्याचं समोर आल्यानंतर स्थानिक पातळीवर चर्चांना अधिक वेग आला आहे.
भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचं, घराणेशाहीला जागा नाही, असा दावा अनेकदा पक्षनेते करत असतात. पण लोह्यातील उमेदवारी वाटपाने पक्षाच्या या दाव्यालाच धक्का बसल्याचं चित्र आहे.
