मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 'स्वबळाचा' नारा मुंबई काँग्रेसने दिला खरा पण त्यांच्यासमोर वेगळीच समस्या उभी राहिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याचे सांगत काँग्रेसने मुंबईत कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण, त्यांच्याकडे काही प्रभागात इच्छुक उमेदवारच नसल्याचे समोर आले आहे. या प्रभागात एकही इच्छुक नसल्याने काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीवर ही आता प्रश्न उपस्थित झाले आहेत.
advertisement
>> काँग्रेसकडून ९०० इच्छुक पण...
मुंबई काँग्रेसने सर्व २२७ जागांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले होते. पक्षाकडे आतापर्यंत ९०० हून अधिक अर्ज प्राप्त झाले असून, बहुतांश जागांवर इच्छुकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. मात्र, २८ वॉर्डांमध्ये अद्याप शुकशुकाट आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी ही संख्या ३५ होती, मात्र गेल्या दोन दिवसांत ७ नवीन अर्ज दाखल झाल्याने हा आकडा २८ वर खाली आला आहे.
मुंबईतील एकूण २२७ प्रभागांपैकी २८ प्रभागांमध्ये अद्याप एकाही इच्छुकाने उमेदवारीसाठी अर्ज सादर केलेला नाही. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
> काँग्रेसची पहिली यादी कधी?
उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेसने एका उच्चस्तरीय 'छाननी समितीची' घोषणा केली आहे. इच्छुकांच्या टप्प्याटप्प्याने मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. समितीची महत्त्वाची बैठक २५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अर्जांची छाननी करून उमेदवारांची निश्चिती केली जाईल. त्यानंतर एक-दोन दिवसांत काँग्रेसची पहिली अधिकृत यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
ज्या २८ जागांवर अद्याप उमेदवार मिळालेले नाहीत, तिथे पक्ष कोणाला संधी देणार की नवीन रणनीती आखणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २५ डिसेंबरच्या बैठकीनंतर मुंबई काँग्रेसच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या पहिल्या तुकडीचे चित्र स्पष्ट होईल.
> काँग्रेसकडून आघाडीचे प्रयत्न...
दरम्यान, काँग्रेसकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि इतरांसोबत चर्चा सुरू केल्याची माहिती आहे. वंचितने काही जागांची मागणी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर, दुसरीकडे काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, डाव्या पक्षांसोबतही चर्चा सुरू केल्या आहेत. मात्र, या चर्चा अद्याप प्राथमिक स्तरावर असून येत्या काही दिवसात त्याला वेग येण्याची शक्यता आहे.
