बुलडाणा : चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे गावात गुरुवारी सकाळी घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. कौटुंबिक वादातून एका तरुणाने आपल्या आई-वडिलांचा निर्घृण खून करून स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, गावात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आई लता डुकरे, मुलगा विशाल डुकरे, वडील सुभाष डुकरे अशी मृत व्यक्तींचे नावे आहेत.विशाल डुकरे हा काही दिवसांपासून दारूच्या आहारी गेला होता. काल रात्री तो मद्यधुंद अवस्थेत घरी परतला. घरात झोपलेल्या आई- वडिलांच्या डोक्यात आणि मानेवर त्याने कुऱ्हाडीने वार करून दोघांना जागीच ठार केले. नंतर त्याने घरातच फाशी घेऊन जीवन संपवलं.
advertisement
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला असून फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या पथकानेही तपास सुरू केला आहे. हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं झालेलं नाही. दारुच्या नशेत घरगुती कारणावरून वाद निर्माण झाल्याने त्याने संतापाच्या भरात आई-वडिलांचा खून करून स्वतःचाही जीव घेतला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
आधी आई- वडिलांना संपवलं मग....
गुरुवारी सकाळी खैरनार कुटुंबातील घरातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने शेजाऱ्यांनी हाक मारली. मात्र, आतून दरवाजा बंद असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी तत्काळ ग्रामस्थांच्या मदतीने दरवाजा तोडला. आत प्रवेश करताच समोर भीषण दृश्य उभं राहिलं. विशालने आई-वडिलांना धारदार शस्त्राने वार करून ठार केल्यानंतर स्वतःही गळफास घेतल्याचे दिसून आले.
घटनास्थळी आढळलेल्या वस्तू जप्त
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी आढळलेल्या वस्तू जप्त केल्या असून पुढील तपास सुरू आहे.
गावकऱ्यांमध्ये हळहळ
या हत्याकांडामुळे सावरगाव डुकरे गावात शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील तिन्ही सदस्यांचा असा अंत झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून आत्महत्येचे नेमके कारण आणि घटनेमागील पार्श्वभूमी शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.
