बुलढाणा, 12 नोव्हेंबर : बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यात डोणगाव रस्त्यावर सायकलस्वाल भिक्षुकाला अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दीपक बाबुराव मोरे असं नाव असलेल्या भिक्षुकाकडे पोलिसांना एक पिशवी सापडली. या पिशवीमध्ये तब्बल 1 लाख 63 हजार रुपयांची रोकड होती. याशिवाय चिल्लर वेगवेगळ्या बँकांची पासबुकं, एटीएम कार्ड, पॅन कार्ड आणि आधारकार्डही सापडलं.
advertisement
पोलीस आधारकार्डच्या मदतीने या भिक्षुकाच्या नातेवाईकाकडे पोहोचले आणि त्यांना ही रक्कम आणि कागदपत्र सुपूर्त करण्यात आली. धनत्रयोदशीच्या दिवशी भिक्षुकाच्या नातेवाईकांकडे ही रक्कम देण्यात आली. पैसे सुपूर्त करताना नातेवाईकांसह पोलिसांनाही गहिवरून आलं.
जगातील सर्वात श्रीमंत भिकारी मुंबईत राहतो, असं म्हणतात, त्याच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण ग्रामीण भागातही असे भिकारी असतात या बातमीवर कोणाचा विश्वास बसणार नाही, मात्र अपघातात मरण पावलेल्या दीपक मोरे यांच्याकडे पोलिसांना मोठी रक्कम आणि एटीएम कार्ड, पासबुकंही सापडली. एकीकडे अठरा विश्वे दारिद्र्य, उपासमार आणि राहायला छत नसणं, ही भिकाऱ्याची व्याख्या केली जात होती, मात्र आता या भिकाऱ्यांकडे लाखोंची रोकड, बँक बॅलन्स आणि अचल संपती आढळून आल्याने ग्रामीण भागातील भिकाऱ्यांचीही श्रीमंती समोर आली आहे.
