अभ्यासाच्या तणावावर विचार करण्याची गरज?
नांदुरा शहरातील दुर्गा नगर परिसरात राहणाऱ्या अठरा वर्षाच्या विद्यार्थ्याने बारावीच्या परीक्षा सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. परीक्षेचा तणाव सहन न झाल्याने या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असल्याचं बोललं जातंय. कल्पेश भुतडा असं आत्महत्या केलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याचं नाव असून बारावीच्या परीक्षांना सामोरं जाण्याऐवजी त्याला मृत्यूला कवटाळणं सोपं वाटलं. त्यामुळे पुन्हा एकदा परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांवरील अभ्यासाच्या तणावावर मंथन करण्याची गरज निर्माण झाली का? असा सवाल उपस्थित होत आहे.
advertisement
बोर्डाची परीक्षा म्हणजे आयुष्याची परीक्षा नव्हे
काल पुण्यात परीक्षा केंद्रात परीक्षा सुरू झाल्यावर अर्ध्या तासाने एका विद्यार्थ्याने दुसऱ्या मजल्यावरील परीक्षा कक्षातून खाली उडली मारल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. उडी मारल्याने जखमी झालेल्या संबंधित विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परीक्षेचा ताण सहन न झाल्याने विद्यार्थ्याने उडी मारल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे बोर्डाची परीक्षा म्हणजे आयुष्याची परीक्षा झालीये का? असा सवाल विचारला जातोय.
पोरांनो लोड घेऊ नका..!
मुलांवर ताण येऊ नये, याची जबाबदारी शिक्षकांनी आणि पालकांनी घेणं गरजेचं आहे. त्यांना अभ्यासात मदत करा, पण त्यांच्यावर दबाव आणू नका. सकारात्मक वातावरण ठेवा, जेणेकरून ते मानसिकदृष्ट्या मजबूत राहतील. जर तुम्ही योग्य तयारी केली असेल तर आत्मविश्वास बाळगा. परीक्षेला आव्हान म्हणून घ्या, भीती म्हणून नाही तर संधी म्हणून पाहा. चिंता वाटत असेल तेव्हा तुमचे मागील प्रयत्न आणि यश आठवा, जेणेकरून तुमचा आत्मविश्वास वाढेल. मॉक टेस्ट आणि जुने पेपर सोडवल्याने परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे समजण्यास मदत होईल. हे तुम्हाला तुमचा वेळ योग्यरित्या वापरण्याची सवय विकसित करण्यास देखील मदत करते.
