बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात विद्युत प्रवाहित झाडाला स्पर्श केल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, तर एक युवक या घटनेत गंभीररित्या जखमी झाला आहे. शेगाव वरवट रोडवरील काथरगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.
खरं तर महावितरणच्या गलथान कारभारामुळे विद्युत वाहिन्या रस्त्यावरील झाडांना स्पर्श करत आहेत.ज्यामुळे पावसामुळे ओल्या झालेल्या झाडात विद्युत प्रवाह संचारला आहे.या झाडाला दोन युवकांनी स्पर्श केल्याने एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. या घटनेनंतक संतप्त नागरीकांनी रस्त्यावर उतरून रस्त्यावर रास्ता रोको केला आहे.त्याचसोबत महावितरण विभागाच्या गलथान कारभाराचा निषेध केला आहे. आणि मृतकाच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देऊन जखमी युवकाच्या संपूर्ण उपचाराचा खर्च महावितरणने करावा अशी मागणी करत रस्ता अडवून ठेवला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
advertisement
कुंपणानंच मजुरांचा घात केला
शेताला लावलेल्या कुंपणाचा धक्का लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या कुंपणात इलेक्ट्रिक करंट सोडण्यात आला होता. त्याची माहिती मजुराला न दिल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. वन्य प्राण्यांपासून शेताचे संरक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या या कुंपणानंच मजुरांचा घात केला. ही घटना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वरखेडे गावात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वरखेडे येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतीत वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेताभोवती तारेचे कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता. मजुरांना या वीज प्रवाहाची कल्पना नव्हती, त्यामुळे त्यांना त्या तारेच्या कुंपणाचा स्पर्श झाला आणि विजेच्या जोरदार धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मृत्यू झालेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील दोन महिला, एक पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. ही घटना नेमकी कधी घडली, याचा पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.