श्रींची पालखी निघण्यापूर्वी टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय कार्यक्रम पार पडतात आणि त्यानंतर सुरू होतो मंदिरातून मार्गस्थ होण्याचा प्रवास. यावेळेस स्थानिक भाविक देखील काही पावले चालत श्रींच्या या पालखीत आपला सहभाग नोंदवतात. या पालखीला व श्रींचे दर्शन घेण्याकरिता राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक शेगावात दाखल होत असतात. व पंढरपूरचा प्रवास सुरू होण्यापूर्वी श्रींच्या पालखीचे दर्शन घेतात. एक आगळा वेगळा अनुभव हा पालखी मार्गस्थ होताना देखील अनुभवाला मिळतो.
advertisement
यंदा पालखीचे हे 56 वे वर्षे असून 700 वारकरी, 250 पताकाधारी, 250 टाळकरी आणि 200 सेवाधारी सहभागी होणार आहेत. श्री संत गजानन महाराजांची पालखी अंदाजे 33 दिवसांत 700 किलोमीटरचे अंतर पायी चालत चार जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल. सहा जुलै रोजी पंढरपूरच्या आषाढी एकादशीमध्ये सहभागी होत परिक्रमेमध्ये देखील सहभाग घेणार आहे.
श्रींच्या पालखीचा पंढरपूर पायदळ प्रवास 2 जून रोजी सुरू होऊन श्री क्षेत्र नागझरी येथील संत गोमाजी महाराज संस्थानमध्ये महाप्रसादानंतर सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पारस येथे रात्रीचा मुक्काम असेल. परतीचा प्रवास हा 10 जुलै रोजी सुरू होणार असून 31 जुलै रोजी शेगाव येथे आगमन होणार आहे.
