बुलढाण्यातील केस गळती प्रकरणात आता मोठी अपडेट हाती लागली आहे. केस गळतीचे नेमके कारण अद्याप शोधण्यात आरोग्य यंत्रणेला यश आलं नाही, अशातच आता केस गळती झालेल्या नागरिकांची दृष्टी कमी झाल्याचं सांगितलं जात आहे. या केस गळतीमुळे तर या लोकांच्या दृष्टीवर परिणाम झाला नाही ना? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केलाय जातोय.
advertisement
दुसरीकडे, बुलढाण्यातील केस गळतीवर आरोग्य यंत्रणेने केलेल्या उपचारानंतर केस गळती बाधित रुग्णांच्या दृष्टीवर परिणाम झाला का? असाही एक संशय व्यक्त केला जातोय. पण केस गळती झालेल्या रुग्णांची दृष्टी कमी होण्यामागं नेमकं काय कारण आहे, याची अधिकृत माहिती समोर आली नाही. पण आरोग्य यंत्रणेने केस गळतीचे नेमके कारण शोधून काढावं. तसेच केस गळतीच्या रुग्णांना सुरू झालेल्या दृष्टी दोषावर लवकरात लवकर उपचार करावेत, अशी मागणी गावकरी करत आहे.
खरं तर, केस गळतीच्या आजारामुळे बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावं आधीच दहशतीखाली जगत आहेत. केस गळतीच्या भीतीने अनेकांनी अंघोळ करणं सोडलं आहे. शिवाय या गावांमध्ये लग्न जुळवायला देखील लोक घाबरत आहेत. अनेकांची लग्न पुढं ढकलल्याची माहिती आहे. केस गळतीच्या आजारामुळे लोकांचं टक्कल पडत आहेच, पण जुळलेली लग्न मोडत असल्याने अनेकांची संसार लग्नाआधीच उद्ध्वस्त होत आहेत. आता येथील लोकांना दृष्टी दोषाणाचा आजार सुरू झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीती वाढली आहे.
